ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, विविध पायाभूत प्रकल्पांची सद्यस्थिती व प्रस्तावित रिंग मेट्रोच्या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषद, मुंबई व जिज्ञासा, ठाणे संस्था यांच्या वतीने ‘ठाणे शहरासाठी लोककेंद्री वाहतूक कशी असावी?’ या विषयावर विशेष नागरिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत नगर नियोजन व वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ विविध प्रकल्पांचे सादरीकरणातून संवाद साधतील. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ओक, अणुभौतिकशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती असेल. ही सभा शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सरस्वती विद्यालय, नौपाडा, ठाणे येथे होईल.
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत वाहनसंख्येत मोठी वाढ झाली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत आहे. परिणामी शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर रोड, ठाणे खाडीवरील पूल, आनंदनगर – साकेत उन्नत मार्ग, खाडीकिनारी सहापदरी महामार्ग, बोरिवली-ठाणे बोगदा तसेच कासारवडवली-वडाळा आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसारखे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र या कामांमुळे सध्या शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, कापूरबावडी परिसरात ठाणे इंटिग्रेटेड रिंग मेट्रोच्या प्राथमिक कामांनाही सुरुवात झाली आहे. मात्र, या प्रकल्पाची सविस्तर माहिती नागरिकांसह नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही देण्यात आलेली नसल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. त्यामुळे रिंग मेट्रोची गरज, त्याची उपयुक्तता, तांत्रिक बाबी, पर्यावरणावरील परिणाम, वाहतूक व्यवस्थेवरील प्रभाव तसेच शहरातील पादचारी, सार्वजनिक बस सेवा व रेल्वे स्थानकांशी जोडणी या मुद्द्यांवर सभेत सविस्तर चर्चा केली जाईल.
कार्यक्रमातील सहभागी तज्ज्ञ
या कार्यक्रमात ठाण्याचा विकास, शहराचे बदलते स्वरूप, वाहतूक समस्यांचा आढावा, सध्या सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची माहिती, इंटिग्रेटेड रिंग मेट्रोची संकल्पना, नागरिकांचे प्रत्यक्ष प्रवासाचे अनुभव व भविष्यातील लोककेंद्री वाहतूक व्यवस्था यावर सादरीकरण करण्यात येईल. यावेळी निकिता सराफ, तृप्ती बिवालकर, उमेश बागवे, सुलक्षणा महाजन, रचना चौबळ यांच्यासह विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच समीर शेख, प्राची देशपांडे, शार्दूल मणेरीकर आणि विवेक पै हे सार्वजनिक पादचारी, रेल्वे व मेट्रो स्थानकांपर्यंत सुलभ पोहोच, पार्किंग धोरण आणि लास्ट माइल जोडणी यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्रही आयोजित करण्यात आले आहे.
