ठाणे : रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील (टीडीआरएफ) जवानाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे सत्य उजेडात आले आहे. २०२३ ते २०२५ या तीन वर्षांत ठाणे ते बदलापूर व भिवंडी या शहरांत रस्ते अपघातांत ६५९ जणांचा मृत्यू झाला. यात वाहनांची समोरासमोर टक्कर, वाहनांना धडक व खड्ड्यांमुळे अपघात झाले आहेत. या आकडेवारीवरून रस्ते अपघातात महिन्याला किमान १७ ते १८ जण मृत्युमुखी पडले आहेत.
जिल्ह्यातून मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, कशेळी-काल्हेर, घोडबंदर, शिळफाटा, बदलापूर -कर्जत मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग जातात. सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी साधने नसल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक खासगी वाहनाने घर ते कार्यालय असा प्रवास करतात. अनेक मार्गांवर जड व अवजड वाहने असतात. रस्त्यांची दुरवस्था, बेशिस्त वाहनचालकांमुळे, बेदरकारपणे वाहने चालविल्याने पादचाऱ्यांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे सोमवारी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानाला जीव गमवावा लागला. जवानाची दुचाकी खड्ड्यात आदळून मृत्यू झाला. या अपघातानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हानगर, अंबरनाथ, बदलापूर व भिवंडी या शहरांमधील मुख्य मार्ग, अंतर्गत रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये २०२३ ते २०२५ (जानेवारी ते डिसेंबर) या तीन वर्षांत ६५९ जणांचा मृत्यू झाला, तर १,६४० जण गंभीर जखमी झाल्याची नोंद ठाणे पोलीस विभागाकडे आहे.
तीन वर्षांतील रस्ते अपघात बळी
-१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या वर्षात २२९ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू, तर ५३५ जण गंभीर जखमी झाले. ४०१ जणांना किरकोळ दुखापत झाली.
-२०२४ मध्ये २३० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू तर ६०८ जण गंभीर जखमी झाले असून ३२३ जणांना किरकोळ दुखापत झाली.
-२०२३मध्ये रस्ते अपघातात २०० मृत्यू, ५९८ गंभीर जखमी व २६७ जण किरकोळ जखमी झाले.
