ठाणे – थुंकल्याचा जाब विचारल्याने ७० वर्षांहून जास्त वय असलेल्या व्यक्तीला मारहाण करणारा प्रवासी वाहतूक कार चालक निशांत शुक्ला (४०) याच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. वृद्ध व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी नितेश पाटोळे यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. दरम्यान, या मारहाणीच्या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कॅडबरी जंक्शन येथील ज्युपिटर रुग्णालय परिसरातील गृहसंकुलात वृद्ध हे त्यांच्या पत्नीसोबत वास्तव्यास आहे. ते पारशी समाजाचे आहेत. मंगळवारी रात्री वृद्ध दाम्पत्य परिसरातून पायी जात होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक कार चालक निशांत शुक्ला हा कारमधून बाहेर थुंकला. त्यास वृद्ध व्यक्तीने थुंकू नको असे म्हटल्याने कार चालकाने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो हाताने वृद्धाला मारहाण करु लागला. काहीवेळाने कार चालकाने पदपथालगत पडलेला दगड उचलून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वृद्ध पदपथावर खाली पडले. त्यात त्यांना दुखापत झाली. बेदम मारहाण होत असतानाही उपस्थित काहीजण बघ्याची भूमिका घेत होते. या घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यामवर प्रसारित झाले.

ठाकरे गटाचे सुमित बोराटे आणि शिंदे गटाचे नितेश पाटोळे या पदाधिकाऱ्यांनी निशांत याचा शोध घेऊन त्याला चोप दिला. तसेच, त्याला वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात होता. बुधवारी सकाळपासून वर्तकनगर पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु होता. सायंकाळी त्या वृद्धासोबत संपर्क झाला. परंतु वृद्ध दाम्पत्य तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. अखेर शिंदे गटाचे पदाधिकारी नितेश पाटोळे यांना पोलिसांनी संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना संपर्क साधून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.