ठाणे : ठाणेसह घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामे २० में पर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतूकीसाठी सुरू करावेत, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए या सर्व यंत्रणांना दिले. तसेच जी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणासह नुकतीच केली. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, , मेट्रोचे अधिक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागाची पाहणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने सद्यस्थितीत सुरू असलेली कामे ही जलगदतीने पूर्ण होत असून रस्ते कॉंक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, जलवाहिनी टाकणे, मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याची सर्व कामे २० में पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. तसेच मेट्रोच्या ज्या ठिकाणची कामे झाली आहे, अशा ठिकाणी पडलेले बॅरीगेटस्, पाईपलाईन, राडारोडा आणि इतर साहित्य ज्याची आवश्यकता नाही असे साहित्य तातडीने उचलण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर हॉस्पिटलगतच्या सेवा रस्त्यावर पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व जलवाहिन्यांच्या कामाची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर, कापूरबावडी जंक्शन येथील मेट्रोचे काम, सिनेवंडर मॉल या भागात सुरू असलेल्या पेट्रोल पंप ते नळपाडा जंक्शन पर्यंत मेट्रो तसेच जल वाहिनीच्या कामाची पहाणी करण्यात आली.

कलव्हर्ट डीप क्लिनींगचे काम हाती घेणार

पावसाळ्यात गटारे, नाल्यामुळे रस्त्यावर पाणी येणार नाही, या दृष्टीने कलर्व्हटचे डीप क्लिनींगचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी स्वत: कार्यकारी अभियंता याची पाहणी करणार आहेत. घोडबंदर रोडवर जुन्या झालेल्या मल वाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे, नवीन मल वाहिन्या टाकताना त्या जुन्या वाहिन्यांशी जोडल्या गेल्या आहेत की नाही याची काळजी घेणे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अडणार नाही या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.

उड्डाणपुलाचे काम २० मे पर्यत पुर्ण करावे.

कासारवडवली आणि भाईंदरपाडा येथील उड्डाणपुलाचे काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे. हे दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले झाल्यावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या उड्डाणपुलाची उर्वरित कामेही २० मे पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच कासारवडवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले महावितरणचे काम त्यांनी जलद स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले.

पावसाळ्यात विशेष काळजी घेणार

दरवर्षी पावसाळ्यात ज्या रस्त्यांवर खड्डे पडतात अशा ठिकाणांची पाहणी करुन त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. घोडबंदर रोडवर विविध कामे एकाचवेळी सुरू असून ती लवकरच पुर्णत्वास जातील. नागरिकांनी देखील सहकार्य करुन वाहतूकीचे नियम पाळावेत, मार्शलच्या सूचना ऐकाव्यात, विरुद्ध दिशेने वाहने चालवू नयेत, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वच प्राधिकरण प्रयत्न करीत असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीएमटी बसमधून आयुक्तांनी केली पाहणी

घोडबंदर रोडवर सद्यस्थितीत मोठ्याप्रमाणावर कामे सुरू असून पाहणीदौरा करताना अधिकाऱ्यांच्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये यासाठी कामांची पाहणी ही सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमेवत परिवहन सेवेच्या बसेसमधून केल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.