ठाणे – आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी आणि शाळेत प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतू, कागदपत्र पडताळणी नंतर पालक शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी जात आहेत. तेव्हा त्यांच्याकडे शाळा प्रशासनाकडून विविध उपक्रमाच्या नावाखाली शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे पैसे भरले नाही तर, शाळेत विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही, असे पालकांना सांगितले जात आहे. यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत असून अनेकांनी अद्याप प्रवेश देखील निश्चित केलेला नाही.

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यंदा ठाणे जिल्ह्यातून आरटीईसाठी ६१५ शाळा पात्र झाल्या असून ११ हजार ७५४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून २५ हजार २१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी सोडतीद्वारे १० हजार ५७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. सुरुवातीला समितींमार्फत कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर, कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यावर ज्या शाळेत आपल्या पाल्याची निवड झाली आहे, त्या शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक जात आहेत. परंतू, काही शाळांमधून पालकांकडे प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारणी केली जात आहे. शिकवणी शुल्क किंवा इतर विविध उपक्रमांच्या नावाखाली हे शुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याची तक्रार काही पालकांनी केली आहे.

या उपक्रमांच्या नावाखाली ठाणे, भिवंडी तसेच नवी मुंबईतील काही शाळांमध्ये ८ हजार, १० हजार असे शुल्क आकारले जात आहे. शिवाय पालकांनी हे शुल्क भरल्यानंतर त्यांना कोणतीही पावती दिली जात नाही तसेच हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने आकारले जात नसून रोख रक्कम भरण्यास पालकांना सांगितले जात आहे. त्यामुळे या खासगी शाळा बेकायदेशिर रित्या आरटीईच्या विद्यार्थ्यांकडून पैसे उकाळत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात असून त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे.

पालक प्रतिक्रिया…

वसंत विहार येथील बीएसबने शाळेत माझ्या भाच्याची आरटीई अंतर्गत निवड झाली आहे. या शाळेत आम्ही प्रवेश निश्चित करण्यासाठी गेलो तेव्हा शाळा प्रशासनाने आमच्याकडे साडेआठ हजार रुपयाची मागणी केली. हे पैसे ऑनलाईन स्वरुपात न देता केवळ रोख रक्कम स्वरुपात द्यावे असेही शाळा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतू, हे शुल्क भरल्याची कोणतिही पावती दिली जात नसून जर हे शुल्क भरले नाही तर शाळेत प्रवेश देखील निश्चित केला जात नाही आहे. – योगेश जगताप, पालक