ठाणे : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ मार्च पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात २५ हजार ५३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ५ हजार ४७० अर्ज हे ठाणे महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांचे असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागामार्फत प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्षे २०२६-२७ करिता आरटीई प्रवेश प्रक्रियेला १७ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत ३ किमी ऐवजी १ किमी अंतरातील शाळा निवडाव्या अशी अट सुरुवातीला घालण्यात आली होती. या अटीमुळे पालकांसमोर शाळा निवडताना पेच निर्माण झाला होता. ही अट रद्द करावी अशी मागणी पालकांकडून
वारंवार होत होती. त्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली. या अटीमुळे सुरुवातीला अर्ज भरण्यासाठी बालकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी या अटीमुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहतात का अशी वेळ आली होती. परंतू, ही अट शिथील करण्यात आल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पुन्हा अर्ज करण्याचा ओघ वाढला.
ठाणे जिल्ह्यात ११ हजार ७५४ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या वर्षी अर्ज करण्यासाठी तीन वेळा मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानुसार, ३१ मार्च अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. ठाणे जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २५ हजार ५३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
ग्रामीण भागातून आरटीईला अल्प प्रतिसाद
१ किमी अंतराची अट रद्द करण्यात आली तरी देखील ग्रामीण भागातून आरटीई प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण, मुरबाड, शहापूर,अंबरनाथ आणि भिवंंडी तालुक्यातून केवळ ८ हजार १९४ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे अंबरनाथ तालुक्यातील आहेत. तर, सर्वात कमी म्हणजे २१५ अर्ज मुरबाड तालुक्यातील आहेत.
महापालिका / तालुका निहाय्य अर्जांची संख्या
महापालिका अर्जांची संंख्या
ठाणे ५,४७०
कल्याण-डोंबिली ३,०९१
भिवंडी १,७४१
उल्हासनगर ६६९
नवी मुंबई ५, ३२६
मीरा भाईंदर ५६२
तालुका अर्जांची संख्या
कल्याण २, ६००
भिवंडी १,४७३
मुरबाड १,०२४
अंबरनाथ २१५
शहापूर २, ८८२
एकूण २५, ०५३
