scorecardresearch

ठाणे आरटीओकडून कारवाईचा बडगा

पाच हजार वाहनचालकांना ४ कोटींचा दंड

ठाणे आरटीओकडून कारवाईचा बडगा

पाच हजार वाहनचालकांना ४ कोटींचा दंड

ठाणे : ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मागील पाच महिन्यांत एकूण ४ हजार ९४५ खासगी आणि व्यावसायिक वाहनांविरोधात नियम मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ई-चलान पद्धतीने ४ कोटी ५४ लाख ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यातील एकूण २७४२ वाहनचालकांकडून दीड कोटी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे, तर उर्वरित २२०३ वाहनचालकांकडून ३ कोटी दंडाची रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू आहे.

ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या शहरांचा समावेश होतो. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे वाहतुकीचे विविध नियम मोडल्याप्रकरणी व्यावसायिक आणि खासगी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात येत असते. प्रादेशिक परिवहन विभागातर्फे कारवाई करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिक वाहनांचा समावेश असतो. यात वाहन योग्यता प्रमाणपत्र न बाळगल्याने किंवा वाहन रस्त्यांवर धावण्यास योग्य नसल्याचे आढळल्यास, अवैध प्रवासी वाहतूक, वाहनाच्या मोजमापापेक्षा अधिकचे समान नेत असल्यास, वाहनांना रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या पट्टय़ा नसल्यास, ठरावीक वजनापेक्षा अधिक मालवाहतूक केल्यास वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येतो. अशाच पद्धतीने मागील पाच महिन्यांत ठाणे ‘आरटीओ’कडून खासगी आणि व्यावसायिक असे दोनही मिळून ४ हजार ९४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या सर्व वाहनचालकांना ई-चलान पद्धतीने दंड ठोठावण्यात आला आहे.

दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहनचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्या वाहनचालकांना ई-चलान स्वरूपात दंड ठोठावण्यात आला आहे त्यांनी नोटीस बजावल्यानंतरही कार्यालयात हजर राहून दंड भरला नाही तर त्यांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता असल्याचे ठाणे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

नियमभंग                                 दंडाची रक्कम

वाहन योग्यता प्रमाणपत्र नसल्यास               ४ हजार रुपये

अवैध प्रवासी वाहतूक                         ४ हजार ते १० हजार रुपये

वाहनांना रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या पट्टय़ा नसल्यास  १ हजार रुपये

वाहनाच्या मोजमापापेक्षा अधिकचे सामान नेल्यास    १० हजार २०० रुपये

जागेअभावी वाहने ताब्यात घेणे अशक्य

नियम मोडणाऱ्या मोठय़ा वाहनांविरोधात प्रामुख्याने ठाणे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई केल्यानंतर या वाहनांना ताब्यात घेऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मुबलक जागा नसल्याने उभे करून ठेवणे अशक्य होते. त्यामुळे त्या वाहनचालकांना ठरावीक कालावधीत दंड भरण्यासाठी बोलावले जात असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane rto collect fined rs 4 crore from five thousand drivers zws

ताज्या बातम्या