कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून महामार्ग, विविध रस्त्यांचे जाळे आहे. समृध्दी महामार्गाचा मोठा टप्पा ठाणे ग्रामीण भागातून गेला आहे. मुरबाड, शहापूर, भिवंडी भागात औद्योगिक क्षेत्र आहे. भिवंडी शहर परिसरात लाॅजिस्टिक पार्क उभी राहिली आहेत.रस्त्यांचे जाळे आणि दळणवळण केंद्रांमुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाहनांची संख्या वाढली आहे.

वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन ठाणे जिल्हा ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करून स्वतंत्र वाहतूक अधिकारी नियुक्त करण्याची मागणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे.अशीच मागणी गेल्या वर्षी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे टिटवाळा शहर अध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी पोलीस महासंचालक आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

कॅप्टन दामले यांनी अर्जात म्हटले आहे, की ठाणे जिल्हा ग्रामीण भागात ११ पोलीस ठाणी आहेत. स्थानिक पातळीवर स्वतंत्र वाहतूक विभाागाची व्यवस्था नसल्याने स्थानिक पोलिसांना अपघात किंवा इतर मोठी दुर्घटना घडल्यावर वाहतूक नियोजनासाठी धावाधाव करावी लागते. पोलिसांचे मनुष्यबळ तुटपुंजे असल्याने अनेक वेळा अपघातस्थळी वाहन कोंडी होते.

ठाणे जिल्हा ग्रामीण भागातून मुंबई नाशिक आग्रा महामार्ग जातो. कल्याण मुरबाड अहिल्यानगर महामार्ग, याशिवाय भिवंडी तालुक्यातील आमणे ते खर्डीपर्यंत समृध्दी महामार्गाचा टप्पा आहे. या महामार्गांवरून सतत वाहनांची वर्दळ असते. याशिवाय तालुक्यातील अंतर्गत भागात जाणाऱ्या मालवाहू आणि इतर वाहनांची संख्या वाढली आहे.

औद्योगिक क्षेत्र विस्तारत असल्याने भिवंडी, शहापूर, मुरबाड परिसरात अनेक लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. याठिकाणी कच्चा माल, पक्का माल घेऊन येणाऱ्या, जाणाऱ्या मालवाहू वाहनांची संख्या वाढली आहे.याशिवाय नागरीकरणामुळे नवीन गृहसंकुले ग्रामीण भागात उभी राहत आहेत. डोंगर दुर्गम भागात शेतघरांची संख्या वाढत आहे.

या वाढत्या नागरीकरण आणि वाहन वर्दळीमुळे ठाणे ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाहन कोंडी होत आहे. त्याचा फटका प्रवाशांना, मालवाहू वाहनांना बसत आहे. टिटवाळा हे तीर्थक्षेत्र आहे. शेकडो भाविक याठिकाणी वाहनाने येत असतात. याशिवाय जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक डोळखांब भागात आजोबा डोंगर, माळशेज घाट भागात पर्यटन स्थळे आहेत. याठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून ठाणे ग्रामीण भागात स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करावा. अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचा वाहतूक अधिकारी या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करावा. त्यानंतर साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ, कनिष्ठ दर्जाचे अधिकारी तालुक्याप्रमाणे या भागात नियुक्त करावे, अशी मागणी कॅप्टन दामले यांनी गृहराज्यमंत्री कदम यांच्याकडे केली आहे.