शहापूर : आगामी काळात संघटना तळागाळापर्यंत अधिक सक्षम करण्यासाठी शहापूर तालुका शिवसेनेने (ठाकरे गट) संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उभारणे, जिल्हा परिषद गट व विभागनिहाय बैठका घेणे आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची दिशा तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. ‘प्रेमाने नाती जोडा आणि शिवसेना संघटना वाढवा’, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
गोठेघर येथील साई भगवान लॉन्स येथे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुकाप्रमुख कुलदीप (बाळा) धानके यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, सहकार सेना, शिक्षक सेना, विविध सेलचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.
यावेळी ‘गाव तिथे शाखा’ या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा सुरू करण्याबरोबरच शाखेचा फलक उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद गट आणि विभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढविणे, तसेच नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा झाली.
एसआयआर प्रक्रियेअंतर्गत प्रारूप मतदार याद्यांची तपासणी करून त्यातील त्रुटींबाबत हरकती नोंदविणे आणि पात्र नागरिकांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. बैठकीदरम्यान मधुकर वेखंडे यांची तालुका सचिव, रविंद्र खाडे यांची तालुका सहसचिव, कमलेश अधिकारी यांची उपतालुकाप्रमुख, हिरामण वाळिंबे यांची विभागप्रमुख, भगवान निमसे यांची उपविभागप्रमुख आणि सोमा कामडी यांची आदिवासी कक्ष विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रश्मी निमसे, तालुका संघटक गुलाब भेरे, संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख, सहसंपर्कप्रमुख बाळू वरकुटे, समन्वयक गणेश अवसरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे, आदिवासी आघाडी जिल्हा संघटक जानू हिरवा, युवासेना जिल्हा युवाधिकारी स्वानंद शेलवले, ज्येष्ठ शिवसैनिक भाई देहरकर, तालुका संघटक चंद्रकांत जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे उपजिल्हाप्रमुख फारूक मेमन यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश फर्डे व रविंद्र खाडे यांनी केले.
