ठाणे – यंदा जून महिना सुरू झाला असला तरी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम आहे. जिल्ह्यातील ३९ गावे आणि १२७ पाडे अशा एकूण १६६ वस्त्यांमधील नागरिकांची तहान सध्या टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने ४० टँकर तैनात करून सुमारे ५८ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असले, तरी शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील अनेक वस्त्या अजूनही टँकर पुरवठ्यावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते.

यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त भागांसाठी विशेष नियोजन केले असून पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी टँकरच्या नियमित फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यांमध्ये सध्या पाणीटंचाईची स्थिती नियंत्रणात असल्याने तेथे टँकरची आवश्यकता भासलेली नाही. मात्र, दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. अनेक विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत कोरडे पडल्याने या भागांतील नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मुरबाड तालुक्यातील ६ गावे आणि १० पाड्यांमधील ५ हजार ६६६ नागरिकांसाठी ६ (३ शासकीय, ३ खाजगी) टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे, शहापूर तालुक्यातील ३३ गावे आणि १२७ पाड्यांमधील तब्बल ५२ हजार ७७७ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३७ टँकर कार्यरत आहेत. जिल्ह्यातील एकूण ४० टँकरपैकी ३७ टँकर शहापूरमध्ये तैनात असल्याने या तालुक्यातील टंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आला आहे. टँकरच्या फेऱ्या, पाणी उचलण्याचे स्रोत आणि वितरण व्यवस्था यांचे डिजिटल प्रणालीद्वारे निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे टँकर वेळेवर पोहोचत आहेत का, नागरिकांना पुरेसे पाणी मिळत आहे का यावर सतत लक्ष ठेवले जात आहे.

टंचाईग्रस्त गावे – ३९

टंचाईग्रस्त पाडे – १२७

एकूण लोकवस्त्या – १६६

लोकसंख्या – ५८ हजार ४४३

कार्यरत एकूण टँकर – ४०

शहापूरमधील प्रभावित टँकर – ३७

मुरबाडमधील प्रभावित टँकर – ०६ (३ शासकीय, ३ खाजगी)

शहापूरमधील लोकसंख्या – ५२ हजार ७७७

मुरबाडमधील लोकसंख्या – ५ हजार ६६६