ठाणे : उष्णतेची तीव्रता वाढत असताना ठाणे ग्रामीण भागातील ३८ गावे आणि १३४ टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये ४० खाजगी टँकर्सद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला असून, यामुळे ५७ हजारांहून अधिक नागरिकांना जलदिलासा मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. विशेष म्हणजे, शहापूर तालुक्यात सर्वाधिक टंचाई असतानाही सूक्ष्म नियोजनातून परिस्थिती नियंत्रणात ठेवली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाई नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेल्या नियोजनामुळे सध्या टंचाईग्रस्त ३८ गावे आणि १३४ वाड्यांमधील नागरिकांना नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या २२ मे २०२६ अखेरच्या साप्ताहिक अहवालानुसार, जिल्ह्यातील ५७ हजार ८ नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ४० खाजगी टँकर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.

पाणीटंचाई निवारणासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत असून, दुर्गम भागांमध्येही वेळेत पाणी पोहोचवले जात आहे. दरवर्षी सर्वाधिक टंचाईचा फटका बसणाऱ्या शहापूर तालुक्यात यंदा विशेष नियोजन करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शहापूरमधील ३३ गावे आणि १२४ वाड्यांतील ५२ हजार ९२ नागरिकांसाठी ३७ खाजगी टँकर्स तैनात करण्यात आले आहेत. टँकर्सच्या नियमित फेऱ्यांमुळे वाड्या-पाड्यांमधील नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यात यश आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मुरबाड तालुक्यातील ५ गावे आणि १० वाड्यांमधील ४ हजार ९१६ नागरिकांसाठी ३ खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.

तिन्ही तालुक्यात टंचाई नाही

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच केलेल्या पूर्वतयारी आणि योग्य व्यवस्थापनामुळे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्ये परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, तिथे टंचाईची कोणतीही गंभीर झळ पोहोचलेली नाही. या तिन्ही तालुक्यांत सध्या एकही गाव किंवा वाडी टंचाईबाधित नसल्याने टँकरची आवश्यकता भासलेली नाही. संपूर्ण जिल्ह्यात आवश्यकतेनुसार खाजगी टँकर्स अधिग्रहित करून प्रत्येक टंचाईग्रस्त घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची चोख व्यवस्था केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.