ठाणे : येथील साकेत पोलीस मैदानाजवळ संरक्षित खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रावर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावाप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मुख्य उत्तरदाता म्हणून ठाणे पोलीस आयुक्तांसह महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. सर्व प्राधिकरणांना न्यायाधिकरणासमोर सविस्तर उत्तर व अहवाल दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यात कसूर केल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
साकेत-बाळकुम रोड परिसरात ठाणे पोलिसांचे मैदान आहे या जमिनीवर ‘मियावाकी’ तंत्रज्ञानाचा वापर करून १८ हजार रोपांची लागवड केली जात होती. पोलीस मैदानाजवळील सर्व्हे क्र. ३८६ (भाग ४) मधील १० हेक्टर जागेवर त्यासाठी भराव टाकण्यात आला. या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर अधिकृत भोगवटादार म्हणून ठाणे पोलीस आयुक्तांची नोंद आहे.
परिसरातील आकाशगंगा गृहसंकुलातील रहिवाशांच्या सतर्कतेमुळे नोव्हेंबर २०२५ पासून सुरू असलेला हा भरावाचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत अनेक खारफुटींची झाडे तोडून मातीखाली गाडल्याचे निष्पन्न झाले आहे. या भरावामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारे नाले पूर्णपणे अडवले गेले आहेत. परिणामी, येत्या पावसाळ्यात रुस्तमजी, आकाशगंगा आणि साकेत यांसारख्या सखल भागांतील गृहसंकुलांना भीषण पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करूनही राबोडी पोलीस ठाण्याकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ‘कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेली संस्थाच स्वतः पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन करत आहे,’ असा संताप पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून व्यक्त केला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जुलैला राष्ट्रीय हरित लवादासमोर होणार आहे. या दिवशी सर्व संबंधित उत्तरदाता प्राधिकरणांना त्यांनी याप्रकरणी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
ही बेकायदेशीर भरणी खुद्द ठाणे पोलिसांच्या जागेवर आणि त्यांच्याच आशीर्वादाने होत असल्याने, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची कोणत्याही शासकीय विभागाची हिंमत होत नाही. अधिकाऱ्यांच्या याच निष्क्रियतेमुळे अनधिकृत भरावप्रकरणी न्याय मिळवण्यासाठी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घ्यावी लागली. – रोहित जोशी, याचिकाकर्ते.
