ठाणे – समग्र शिक्षा अभियानांतर्गत मागील १४ ते २५ वर्षे कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद ठाणेच्या ५३ कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षण व्यवस्थेलाही अनुभवी मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.

सर्व शिक्षा अभियान आणि समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २००१-०२ पासून जिल्हा परिषद ठाणे येथे कार्यरत असलेल्या ५३ कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासनाच्या निर्देशानुसार समायोजन करून त्यांना शासन सेवेत रुजू करण्यात आले आहे. तब्बल १४ ते २५ वर्षे सातत्याने सेवा बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरला आहे.

सर्व शिक्षा अभियानाच्या प्रारंभानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद नियमावली, १९९४ तसेच १३ मार्च २००३ रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध पदांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हास्तरावर निवड समिती स्थापन करून वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. लेखी व तोंडी परीक्षांद्वारे गुणवत्तायादीच्या आधारे पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती.

समग्र शिक्षा विभागात कार्यकारी अभियंता, जिल्हा समन्वयक, कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सहाय्यक, वरिष्ठ लेखा लिपिक तथा रोखपाल, एमआयएस समन्वयक आणि विषयतज्ज्ञ अशा विविध पदांवर हे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. गेली अनेक वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

शाळांच्या पायाभूत सुविधा उभारणे, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल माहिती व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शैक्षणिक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण विभागाला सातत्याने होत आला आहे.

गेली अनेक वर्षे समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समायोजन करून त्यांना कायम सेवेत सामावून घेणे हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा लाभ भविष्यातही जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला मिळत राहील. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे.- बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)