ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टिकूजीनी वाडी येथील निसर्ग परिचय केंद्र परिसरात १९३ एकर भूखंडाचे प्रकरण निकाली निघाल्यानंतर येथे मोठ्याप्रमाणात वृक्षतोड, जमीन समतलीकरणाची कामे सुरु झाल्याचा दावा वनशक्ती संस्थेने केला. तसेच, संस्थेने ठाणे महापालिका, वन विभागासह संबंधित सर्व विभागांना कायदेशीर नोटीस पाठवून कामे थांबविण्याची मागणी केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अंतिम सीमारेषा निश्चित होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वृक्षतोड अथवा विकासकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील चितळसर मानपाडा भागातील वन खात्याच्या जमीनीसंदर्भात ठाणे महापालिका आणि मे. दाह्याभाई अँड कंपनी यांच्या समझोत्याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमति याचिका निकाली काढली होती. वनशक्तीच्या म्हणण्यानुसार, परिसरात रस्ता बांधणी आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. तसेच या भागाच्या प्रवेशद्वारात आणि सीमारेषांमध्ये बदल करण्यात आल्याचे दिसत असून संबंधित जमिनीचा ताबा आता ठाणे महापालिकेकडे असल्याचे दर्शविण्यात येत आहे.

त्यानंतर वनशक्ती या संस्थेने वकील रोनिता भटाचार्या बेक्टर यांच्या मार्फत ७ जूनला ठाणे महापालिका आयुक्त, उपवनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक, पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निरीक्षण समिती, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग आणि नगरविकास विभागाला नोटीस पाठविली आहे. नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, भूखंडावरील विकासकामे तात्काळ थांबवा. तसेच पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अंतिम सीमा प्रत्यक्ष मोजणी करुन निश्चित होईपर्यंत सद्यस्थिती कायम ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाने २० फेब्रुवारीला दिलेल्या निकालानंतर मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु झाली तरीही पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे नोटीसमध्ये म्हटले. त्या निर्णयाचा अर्थ आवश्यक पर्यावरणीय मंजुरींशिवाय वृक्षतोड, डोंगर कापणे, उत्खनन, जमीन समतलीकरण किंवा इतर विकासकामांना परवानगी मिळते असा लावता येणार नाही असा दावा देखील करण्यात आला आहे. तातडीने कारवाई न झाल्यास आणि वृक्षतोड किंवा विकासकामे सुरू राहिल्यास संबंधितांविरुद्ध योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही वनशक्तीने दिला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतिम आणि अचूक सीमारेषा तसेच परिसंवेदनशील क्षेत्राच्या मर्यादा अद्याप स्पष्टपणे निश्चित करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेपूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास पर्यावरणीय हानी होऊ शकते. त्यामुळे भविष्यात वनक्षेत्राचा दर्जा, जैवविविधता, वन्यजीव अधिवास आणि बफर झोन संदर्भातील नियमांबाबत भविष्यात घेतले जाणारे निर्णय निष्प्रभ ठरतील अशी चिंता देखील संस्थेने व्यक्त केली.

प्रकरण निकाली निघाले असले तरी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र निरीक्षण समितीच्या परवानगी शिवाय या क्षेत्रात कोणतेही काम करता येत नाही. असे असतानाही येथे विना परवाना कामे सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात वृक्षतोड, उत्खानावर बंदी आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई झाली नाही तर कायदेशीर कार्यवाही करु. – स्टॅलिन डी., संचालक, वनशक्ती संस्था.