ठाणे : मुंबई महानगराचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १९३ एकर जमीन वनक्षेत्र म्हणून संरक्षित करावी, जंगल वाचवावे, जंगल वाचवावे अशा विविध मागण्यांसाठी रविवारी ठाणे आणि मुंबईतील शेकडो नागरिकांनी मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी परिसरात मानवी साखळी तयार केली.

या आंदोलनात पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. ”जंगल वाचवा”, ”संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षण करा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राष्ट्रीय उद्यानातील वनक्षेत्र कमी होणे, जैवविविधतेला निर्माण होणारा धोका आणि भविष्यातील पर्यावरणीय परिणाम याबाबत आंदोलनकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध वनस्पती, दुर्मिळ प्राणी, पक्षी आहेत. मुंबई आणि ठाणे शहरात पसरलेल्या या जंगलात निसर्गप्रेमी तसेच अभ्यासक येतात. शुद्ध हवा मिळविण्यासाठी सकाळी चालण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. काही दिवसांपूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पायथ्याशी असलेल्या १९३ एकर जमीनीच्या मालकी हक्कासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले.

ठाणे महापालिका आणि मे. डी. डायाभाई यांच्यात झालेल्या समझोत्याची नोंद घेत न्यायलायने विशेष अनुमति याचिका निकाली काढली. या निकालानंतर जमिनीच्या मोबदल्यात सुमारे २,८०० कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरु झाली. परंतु ही १९३ एकर जमीन वन विभागाने वन क्षेत्र म्हणून संरक्षित केली जावी, विकास आराखड्यातील १०० एकर जमीनीवरील सर्व आरक्षण रद्द करावे, फूटहिलचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासींची घरे वाचविली जावीत अशा विविध मागणी यावेळी आंदोलकांनी केल्या. तसेच टिकुजी-नी-वाडी ते खेवरा चौकार्यंत मानवी साखळी करुन सरकारविषयी नाराजी व्यक्त केली. मुंबई आणि ठाणे शहरातील नागरिकांनी यामध्ये मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता.