ठाणे – सरस्वती मंदिर ट्रस्टच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “विद्या विनयेन शोभते” या ब्रीदवाक्याने कार्यरत असलेल्या या संस्थेचा अमृत महोत्सव शनिवार, ६ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता शाळेच्या परिसरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे, वेबपेजचे उद्घाटन केले जाणार आहे.
नौपाडा परिसरातील सरस्वती सेकंडरी शाळेची मुख्य संस्था असलेल्या सरस्वती मंदिर ट्रस्टची स्थापना १९५२ मध्ये झाली. स्थापनेच्या वर्षी मराठी प्राथमिक विभाग सुरू करण्यात आला, तर १९६२ मध्ये माध्यमिक विभागाची भर पडली. “विद्या विनयेन शोभते” हे ब्रीदवाक्य स्वीकारून संस्थेने गेल्या ७५ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, संस्कार आणि मूल्यांची शिकवण दिली आहे. शिक्षण क्षेत्रापुरते मर्यादित न राहता संस्थेने विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
पर्यावरण संवर्धन, शेती शिक्षण, परिसर विकास, ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, दुर्बल घटकांसाठी विशेष योजना तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून संस्थेने समाजाशी असलेले नाते अधिक दृढ केले आहे. त्यामुळे सरस्वती मंदिर ट्रस्ट ही केवळ शैक्षणिक संस्था न राहता सामाजिक परिवर्तनाचे केंद्र म्हणूनही ओळखली जाते.
यंदा या संस्थेचा शनिवार, ६ जून रोजी अमृत महोत्सवी सोहळा आहे. त्यानिमित्त सायंकाळी ४.३० वाजता सरस्वती मंदिर ट्रस्टच्या परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन तसेच अमृत महोत्सवी विशेष वेबपेजचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता उमा निळकंठ व्यायाम शाळा येथे दुसऱ्या सत्रातील कार्यक्रम पार पडणार आहे.
यावेळी १९५२ ते १९६० दरम्यान शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांची शाळेची घंटा वाजवून “शाळा भरविण्याचा” प्रतीकात्मक शुभारंभ करण्यात येणार आहे. जुन्या शालेय आठवणींना उजाळा देणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्तांचे मनोगत, तसेच उमा निळकंठ व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेतर्फे गौरवपत्र प्रदान करण्यात येणार असून माजी विद्यार्थ्यांकडून “आठवणींना उजाळा” देणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या अमृत महोत्सवी सोहळ्यामुळे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
