ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने मंगळवारी जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने मंगळवार, ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार हा आदेश जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार उद्या, मंगळवारी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतुकीला अडथळे निर्माण होणे आणि आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात ये-जा करताना कोणताही धोका निर्माण होऊ नये, तसेच संभाव्य आपत्ती टाळण्याच्या उद्देशाने ७ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासन आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
