ठाणे : ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवार, ६ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या सलग दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा-भाईंदर तसेच ग्रामीण भागातील अनेक सखल परिसर जलमय झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही भागांत दीर्घकाळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी तुंबणे, सखल भागांमध्ये पाणी शिरणे अशा घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून, नदीकाठच्या परिसरांवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने सोमवार, ६ जुलै रोजी रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, पोलीस, महापालिका, नगरपरिषद, अग्निशमन दल तसेच इतर संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले, धबधबे आणि पाणी साचलेल्या परिसरांपासून दूर राहावे तसेच जिल्हा प्रशासन आणि भारतीय हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
