scorecardresearch

ठाणे जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू

ओमायक्रॉन या उत्परिवर्तीत करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

निवारी आणि आश्रमशाळा वगळल्या

ठाणे : ओमायक्रॉन या उत्परिवर्तीत करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या करोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने शासनातर्फे शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे वर्ग २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.  जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरणही वेगाने सुरू आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना वर्धक मात्राही देण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून जिल्ह्यात दररोज तीन हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या निम्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील निवासी व आश्रमशाळा वगळता १ ली ते १२ वीचे वर्ग सोमवारपासून प्रत्यक्षरित्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी काही नियम लागू केले आहेत. त्यानुसार शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र घेणे शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक असणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे संमतीपत्र नसेल त्यांच्यासाठी ऑनलाइन पद्धतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार आहेत. शाळेत अध्यापनासाठी येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळेत येणाऱ्या १५ ते १८ वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांच्या लसीकरणासाठी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी स्थानिक प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी दिले आहेत.

पूर्व प्राथमिक शाळांनाही परवानगी 

जिल्ह्यातील १ली ते १२वीच्या वर्गाबरोबरच सोमवारपासून जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पूर्व प्राथमिक (नर्सरी ते सिनिअर केजी) शाळाही प्रत्यक्ष सुरू करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. या शाळा सुरू करत असताना करोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane school start student happiness corona ysh

ताज्या बातम्या