ठाणे : भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी शनिवार, ४ जुलै रोजी ”रेड अलर्ट” जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळा शनिवारी बंद राहणार आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यात पुढील २४ तासांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहण्याची, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची, पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची तसेच घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार हा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाले, धबधबे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे तसेच हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून आपत्ती व्यवस्थापन पथके, महसूल विभाग, पोलीस, महापालिका, नगरपरिषद आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.