ठाणे : हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी शनिवार, ४ जुलै आणि रविवार, ५ जुलैला रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून ठाणे जिल्हा प्रशासनाने शनिवार, ४ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. महापालिकेने या संधर्भात पत्रक काढले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा ही शहरे येतात. शेकडो खासगी आणि सरकारी शाळा या शहरात आहेत. या सर्व शाळा शनिवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभाग तसेच संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांनाही अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेडून करण्यात आले आहे.