ठाणे: अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने सलग तीन दिवस शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असली, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ठाण्यातील अनेक शाळा आणि काही महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्गांचे नियोजन केले होते. शासनाच्या आदेशाचे पालन करत नियमित वेळापत्रकानुसार अध्यापन सुरू ठेवण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनाने शनिवार, सोमवार आणि मंगळवारी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, शिक्षणात खंड पडू नये यासाठी अनेक शाळांनी बालवाडीपासून कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवले. यासाठी पूर्वनियोजित वेळापत्रक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांनी नियमित अध्यापन, पुनरावृत्ती, शंकानिरसन आणि अभ्यासाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत वर्गांना उपस्थिती लावली.
ऑनलाइन वर्गांमध्ये केवळ अध्यापनच नव्हे, तर शाळेची शिस्तही कायम ठेवण्यात आली. विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यात आली, ऑनलाइन प्रार्थना सभा घेण्यात आल्या आणि अनेक विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात वर्गांना उपस्थित राहत शिस्तीचे पालन केले. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड सुरू राहिले.
ठाण्यातील सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांनी पूर्णपणे पालन केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासात खंड पडू नये, तसेच पुनरावृत्ती आणि शंकानिरसनासाठी शाळेने सर्व विभागांसाठी ऑनलाइन वर्गांचे आयोजन केले. हे वर्ग पूर्वनियोजित नियमित वेळापत्रकानुसार घेण्यात आले. शाळेचे प्राचार्य रेव्ह. फादर डॉ. थॉमसन किन्नी यांनी संपूर्ण ऑनलाइन अध्यापनावर सातत्याने देखरेख ठेवली. त्यांनी स्वतः इयत्ता चौथी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्गही घेतले. त्यामुळे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शैक्षणिक प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले.
