ठाणे : नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात १०७ विविध आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरे घेण्यात आली असून, त्यातून तब्बल १४ हजार ७८२ नागरिकांना विविध आरोग्यसेवांचा लाभ मिळाला आहे. आरोग्य तपासणीपासून असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान, मानसिक आरोग्य, महिला आरोग्य, पोषण, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीच्या जनजागृतीपर्यंत विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या विविध यंत्रणांच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे.
अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या १२ आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये ३ हजार ७६० नागरिकांची तपासणी करण्यात आली. असंसर्गजन्य आजार तपासणीच्या आठ उपक्रमांतून २ हजार ३४१ नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर मानसिक आरोग्य स्क्रीनिंग आणि समुपदेशनाच्या सात उपक्रमांतून ७१९ नागरिकांना सेवा देण्यात आली. निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृतीच्या १२ उपक्रमांतून १ हजार ५२६ नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश पोहोचविण्यात आला आहे. व्यसनमुक्ती जनजागृती आणि समुपदेशनाच्या सात उपक्रमांतून १ हजार १२० नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
महिला आरोग्य आणि स्वच्छतेलाही अभियानात विशेष महत्त्व देण्यात आले असून, सात उपक्रमांच्या माध्यमातून १ हजार ११० नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले. पोषण आणि अॅनिमियाबाबत जनजागृतीच्या आठ उपक्रमांतून १ हजार ५५९ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुला-मुलींच्या क्षमता बांधणीसाठी आठ उपक्रम घेण्यात आले असून, त्यातून ३५६ जणांना लाभ झाला आहे. योग आणि ध्यानाच्या दोन सत्रांमध्ये ५९८ नागरिकांनी सहभाग घेतला, तर दोन आयुष्मान भारत कार्ड वाटप उपक्रमांतून ३१३ नागरिकांना लाभ मिळाला.
माता आणि बाल आरोग्यालाही अभियानात प्राधान्य देण्यात आले आहे. मध्यम व तीव्र अॅनिमियाग्रस्त गर्भवती महिलांना एफसीएम इंजेक्शन देणे, किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यविषयक क्षमता वाढविणे तसेच बालकांच्या सुरुवातीच्या आणि केवळ स्तनपानाबाबत जनजागृती व क्षमता बांधणी करण्यात येत आहे. महिलांच्या आणि किशोरवयीनांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्यविषयक माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात येत आहे.
३० वर्षांवरील नागरिकांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदू आणि कर्करोग तपासणीचा समावेश करण्यात आला आहे. असंसर्गजन्य संबंधित रुग्णांच्या उपचाराचा पाठपुरावा करण्यासाठी घेण्यात आलेल्या १३ उपक्रमांतून ५२५ नागरिकांना सेवा व मार्गदर्शन मिळाले आहे.
आरोग्यसेवा केवळ तपासणी शिबिरांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावरही भर देण्यात येत आहे. हायड्रॉक्सीयुरिया, सर्पदंशावरील (एएसव्ही) आणि रेबीज प्रतिबंधक लस (एआरव्ही) तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरील औषधांचा आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. दुर्मिळ आजारांसाठी कॉर्पस फंडाची उपलब्धता आणि आवश्यक उपचारसेवा सक्षम करण्याचाही अभियानात समावेश आहे. आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य तपासणी घेण्याबरोबरच समुदाय आरोग्य अधिकारी, एएनएम, एमपीडब्ल्यू आणि आशा स्वयंसेविकांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. नागरी भागातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून, जनआरोग्य समिती, महिला आरोग्य समिती आणि एकात्मिक आरोग्य समित्यांच्या नियमित बैठकीद्वारे आरोग्यसेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ आरोग्य शिबिरांचे आयोजन न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य, आजारांचे लवकर निदान, जनजागृती, समुपदेशन, उपचाराचा पाठपुरावा आणि नागरिकांचा सहभाग या सर्व बाबींना एकत्रित करणारे अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध आरोग्य यंत्रणांच्या समन्वयातून अभियानाची अंमलबजावणी सुरू असून, आरोग्यसेवा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
