ठाणे – अजेय संस्थेच्या अजेय स्टुडिओज आणि भावमुद्रा अभिनय व काव्य संशोधन केंद्रातर्फे आयोजित ‘शब्दश्री’ या अनोख्या साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमाने ठाण्यात विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या कार्यक्रमाची अधिकृत नोंद ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’मध्ये झाली असून, ठाण्याच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी आयोजित ‘शब्दश्री या उपक्रमात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील दुर्मिळ साहित्यावर आधारित तब्बल १०० सादरीकरणे १०० कलाकारांनी एकाच दिवशी सादर केली. तसेच अभिवाचन, काव्य, नाट्य, चित्रकला, गायन, नृत्य आणि पोवाडा अशा विविध कलाप्रकारांतून सादरीकरणे झाली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या ९ ते ८७ वर्षां दरम्यानच्या कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी अरुण नलावडे, कवयित्री अनुपमा उजगरे, उषा चांदुरकर, प्रा. मेधा सोमण, प्रकाश दिघे आणि नरेंद्र बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘शब्दश्री’ची संकल्पना भावमुद्रा केंद्राचे संचालक डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची आहे. आयोजनात गौरव संभूस, नलिनी पुजारी आणि अस्मिता चौधरी यांचा मोलाचा सहभाग लाभला.
