ठाणे : ठाण्यातील झोपडपट्टी पुर्नविकास योजनेतील घरांच्या परस्पर विक्रिची अनेक प्रकरणे यापुर्वीच चव्हाट्यावर आली असताना आता रस्ते रुंदीकरणात महापालिकेने बाधितांना दिलेल्या व्यावसायिक गाळ्यांचीही परस्पर विक्रि होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नौपाडा येथील शाहू मार्केट या अतिशय मोक्याच्या बाजारात ठाणे महापालिकेने रस्ते रुंदीकरणात बाधित झालेल्या गाळेधारकांना ७७ गाळ्यांचे वाटप केले होते. यापैकी ३५ गाळ्यांची परस्पर विक्रि केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
बाधितांना अशाप्रकारे घरे अथवा गाळ्यांची परस्पर विक्री करण्याचे अधिकार नसतात. मात्र या संपूर्ण प्रकरणाला आता कायदेशीर मान्यता देण्यात आली असून या व्यवहाराच्या हस्तांतरणास सर्वसाधारण सभेत मान्यताही देण्यात आली आहे. भाजपचे या भागातील ज्येष्ठ नगरसेवक सुनेश जोशी यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या संपूर्ण प्रकारावर आक्षेप नोंदविला. मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचे याच भागातील अन्य एका नगरसेवकाने या विषयाला मान्यता देण्यात आग्रह धरत या ३५ गाळ्यांच्या विक्रि प्रकाराला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजुर करवून घेतला.
अशा प्रकारच्या मान्यतेमुळे आता शहरातील इतर भागात झालेल्या बाधितांच्या गाळे अथवा घर वाटपालाही परस्पर विक्रिचे अधिकार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाप्रकारे बाधितांना वाटप करण्यात आलेल्या घर आणि गाळे विक्रिचा मार्ग प्रशस्त करत एका नव्या घोटाळ्याचे दरवाजे यानिमीत्ताने खुले करण्यात आल्याची चर्चाही सुरु झाली आहे. महापालिकेचा नेमका प्रस्ताव काय ? महापालिकेने रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी शाहू मार्केटमधील गाळे भुईभाडे तत्त्वावर दिले होते. मात्र, यातील ३५ मूळ गाळेधारकांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता हे गाळे परस्पर अन्य व्यक्तींना हस्तांतरित केले. हा हस्तांतरण व्यवहार म्हणजे एका अर्थाने विक्रि स्वरुपातील असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे महापालिकेची शाहू मार्केटची जुनी आणि धोकादायक इमारत पाडून त्याठिकाणी नवीन इमारत आणि सार्वजनिक वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ७७ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. बायोमेट्रिक सर्वेक्षणात ३५ गाळेधारकांची नावे महापालिकेच्या मूळ अभिलेखातील असलेल्या गाळेधारकांपेक्षा वेगळी आढळून आली.
महापालिकेच्या पूर्वपरवानगीविनाच या गाळेधारकांनी हे गाळे परस्पर अन्य व्यक्तींना विकल्याचे प्रशासनाच्या प्रस्तावातच नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे पुर्नवसनाच्या माध्यमातून मिळालेले भाडेतत्वावरील गाळे थेट विकता येतात का हा महत्वाचा प्रश्न अनुत्तरीत असताना या सर्व व्यवहाराला कायदेशीर स्वरुप देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला.
शिवसेनेचे गटनेते पवन कदम आणि भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडून यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्यामुळे हा प्रस्ताव मांडल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. मात्र नौपाडा भागातील भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी त्यास हरकत घेतली. भाड्याने दिलेले गाळे संबंधित व्यक्ती परस्पर कशी विकते, असा जोशी यांचा सवाल होता. तसेच या व्यवहारास कायदेशीर मान्यता कशी देता येईल, असा मुद्दाही जोशी यांनी उपस्थित केला.
भाजप नगरसेवक आमने-सामने या प्रस्तावास भाजप नगरसेवक सुनेश जोशी यांनी प्रस्तावावर आक्षेप नोंदविला. तर, भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी प्रस्तावाच्या बाजूने भुमिका मांडली. यावरूनच जोशी आणि वाघुले आमनेसामने आले. महापालिकेने बायोमेट्रिक मुळ गाळे धारकांच्या नावाने करणे अपेक्षित होते. पण, ते दुसऱ्यांच्या नावाने चुकीच्या पद्धतीने केले आहे. तसेच महापालिकेची परवानगीविना गाळे विकले किंवा हस्तांतरित केले असतील, तर अशा व्यवहारांना पुनर्वसनाच्या नावाखाली मान्यता देण्यास विरोध असल्याची भूमिका जोशी यांनी मांडली.
तर, रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या व्यक्ती असल्याचे सांगत वाघुले यांनी प्रस्तावाच्या बाजुने भुमिका मांडली. तर, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या प्रयत्नांमुळे या सर्वांचे पुनर्वसन झाले होते, असा दावा करत हा प्रस्ताव मंजुर करण्याचा आग्रह शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी धरला. अखेर जोशी यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध नोंदवला असतानाही, वाघुले यांच्या भूमिकेला शिंदे सेनेचे गटनेते पवन कदम यांच्या समर्थक नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
