ठाणे : येथील शास्त्रीनगर भागात शुक्रवारी घरामध्ये लागलेल्या आगीत होरपळून मांजराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. आगीत घरातील साहित्य जळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शास्त्रीनगर येथील भोईंर कंपाऊंड परिसरात चाळ आहे. या चाळीत एकमजली घर असून घराच्या पहिल्या मजल्यावर चारजण वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. आग लागली त्यावेळी तीन सदस्य कामानिमित्ताने बाहेर गेले होते. तर महिला घरामध्ये होती. आग लागल्यानंतर महिला घरातून बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले. या आगीत घरामधील मांजरीच्या पिलाचा होरपळून मृत्यू झाला.
आगीमुळे घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट, टीव्ही, लाकडी सोफा, गादी, घरातील कपडे आणि इलेक्ट्रिक तारा पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. घरामध्ये आग लागल्याने घराच्या छताचे लोखंडी पत्रे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पथकाने आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
