ठाणे : दुचाकीला धक्का लागल्याने टेम्पो चालकाची तीन जणांकडून झालेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.केतन धामनसकर (३८) असे मृत व्यक्तीचे नाव असून जितेश टावरे (२१), वेदांत टावरे (१८) आणि धीरज म्हात्रे (२५) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. केतन धामनसकर हे त्यांच्या पत्नीसोबत खर्डीगाव भागात वास्तव्यास होते. त्यांना १३ वर्षांचा मुलगा देखील आहे. टेम्पो भाडेतत्त्वावर घेऊन ते कुटुंबाचा उदर्निवाह करतात. तर त्यांची पत्नी घरकाम करते.
२२ मे या दिवशी त्यांच्या टेम्पो आणि दुचाकीमध्ये किरकोळ अपघात झाला होता. या अपघाताबद्दल जितेश हा केतन यांच्याकडून नुकसान भरपाई देखील मागू लागला. केतन यांची वाहन चालविताना चूकी नसतानाही त्यांनी १० ते १२ हजार रुपये खर्च करण्याचे कबूल केले. असे असतानाही जितेश, वेदांत आणि धीरज यांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती केतन यांनी घरी आल्यावर त्यांच्या पत्नीला दिली.
२३ मे यादिवशी केतन यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी घराचे साहित्य आणण्यासाठी गेले होते. तर केतन हे घरातच झोपले होते. सुमारे तासाभराने त्यांची पत्नी घरी आली असता, केतन हे हालचाल करत नव्हते. त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. २४ मे यादिवशी त्यांच्या मृत्यूबाबत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये केतन यांचा मृत्यू ‘डोके आणि पाठीवरील अनेक गंभीर मारांमुळे महत्त्वाच्या अवयवांना दुखापत होऊन मृत्यू झाला’ असे अहवालात म्हटले होते. केतन यांच्यावर अत्यंविधी झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने याप्रकरणी तिघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
