ठाणे -जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शिळ गावातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे गावातील प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले असून, शुक्रवारी या परिस्थितीचा कळस गाठणारी घटना घडली. एका नागरिकाच्या अंत्ययात्रेला चक्क गुडघाभर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत स्मशानभूमीकडे जावे लागले. या घटनेमुळे ठाणे महापालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनावर आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्याच्या विविध शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचत आहे. तर अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने नालेसफाई देखील झाली नसल्याने पाणी थेट मुख्य रस्त्यांवर साठून राहत आहे. याच पद्धतीने दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या शिळ गावातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे गावातील प्रमुख रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. याचा फटका गावातुन निघालेल्या अंत्ययात्रेला देखील बसला. दिवा प्रभाग समितीमधील शिळ गावातील अंत्ययात्रेची चित्रफित समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये अंत्ययात्रेत सहभागी झालेले ग्रामस्थ गुडघाभर पाण्यातून मृतदेह घेऊन जात असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. रोजच्या जीवनात नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आता नवे राहिलेले नाही. मात्र, मृत व्यक्तीच्या अखेरच्या प्रवासासाठी अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शिळ गावात दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सक्षम व्यवस्था नसल्याने रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा आपत्कालीन सेवांनाही या परिस्थितीचा फटका बसतो. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि जलनिस्सारणाची कामे पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कार्यक्षमतेवर या घटनेमुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष शरद पाटील यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.”महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे शिळं गावातील नागरिकांना ना व्यवस्थित जगता येत आहे, ना माणसाला सन्मानाने निरोप देता येत आहे. अनेक वर्षांपासून निवेदने, पाठपुरावा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र दिवा प्रभाग समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे सातत्याने दुर्लक्ष केले, ” असा आरोप त्यांनी केला.

येत्या दोन दिवसांत शिळं गावातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्रामस्थांसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रतीकात्मक उत्तरकार्य विधी घालून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही शरद पाटील यांनी दिला आहे.