ठाणे – ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ अ मधून बिनविरोध निवडून आलेल्या शिंदे सेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे पद बोगस आदिवासी प्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. हा शिंदे सेनेसाठी धक्का मानला जात आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ अ मधून सुलेखा चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्या दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी आहेत. त्यांनी निवडणुकीत आदिवासी प्रमाणपत्र सादर केले होते. हे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार दाखल झाली होती.

प्रमाणपत्राबाबत झालेल्या चौकशीत त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा आदिवासी संघटनांकडून करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी आदिवासी नेते लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चाही काढला होता. चव्हाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती.

दरम्यान, धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने १६ जून २०२६ रोजी आदेश दिला. या आदेशानुसार सुलेखा चव्हाण यांचे नगरसेविका पद आपोआप संपुष्टात आल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ५ अ मधील नगरसेविका पद १६ जूनपासून रिक्त झाले आहे. या रिक्त जागेबाबत पुढील नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याची विनंती आयुक्तांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.