scorecardresearch

“ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आदेशावर चालते की महापौरांच्या विचारसरणीवर?”

राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा पालकमंत्री एकनाथ शिंदेना खोचक सवाल

Shiv Sena follow the ideology of the mayor Question by Anand Paranjape
(फाइल फोटो सौजन्य पीटीआय)

एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असतानाच ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के हे शिवसेना-भाजपा नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लागावला आहे.

माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशारा महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपामध्ये नैसर्गिक युती असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला.

“काल ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची महासभा संपन्न झाली. त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे त्यांच्यातील अहंपणा आणि अहंकार आजही त्यांच्यातून गेलेला नाही. खरंतर त्यांची महापौरपदाची अडीच वर्षांची कारकिर्द आज संपली आहे. कालदेखील महासभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत असताना, शिवसेना आणि भाजपा ही नैसर्गिक युती असल्याचे संभाषण करीत स्वबळाचा नारा दिला. आम्हाला तर आश्चर्य वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे हे एकीकडे म्हणतात की ३० वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. सापाला आम्ही दूध पाजले आणि ठाण्याचे महापौर हे सेना-भाजपाची नैसर्गिक युती आहे अन् हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा प्रकारचे भाष्य करत आहेत. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालते की शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, विद्यमान महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करायला हवा,” असे आनंद परांजपे यांनी म्हटले.

“गुरुवारी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. आम्ही त्याचे स्वागतच करतो. किंबहुना, त्यांना शुभेच्छाच देतो. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, जिथे शक्य आहे तिथे महाविकास आघाडी झालीच पाहिजे असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने महाविकास आघाडी ठाण्यात गठीत झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. आमचादेखील तोच प्रयत्न आहे. उद्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तर आम्ही त्याचे स्वागत करु. नशिबाने नरेश म्हस्के असे म्हणाले नाहीत की, १४२ पैकी १४२ नगरसेवक आमचेच निवडून येतील. कारण, त्यांचा चाणक्याचा कलियुगातील नारद कधी झाला, हे त्यांना समजलेलेच नाही,” असा टोलाही परांजपे यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane shiv sena follow the ideology of the mayor question by anand paranjape abn