ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे काही काळ सामाजिक आणि राजकीय जीवनातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत यांच्या आरोग्याबद्दल चिंतेची भावना व्यक्त होत असताना, त्यांचे कट्टर विरोधक शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के ( Naresh Mhaske ) यांनी एक महत्वाचे विधान करत राऊत लवकर बरे व्हावेत, ही प्रामाणिक इच्छा असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या काळात सातत्याने माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका मांडली. त्यांच्या सकाळच्या वेळेत होणाऱ्या पत्रकार परिषदेला भाजपकडून ‘सकाळचा भोंगा’ अशी उपाधी देण्यात आली होती.
दरम्यान, संजय राऊत यांनी एक्सवर एक पत्र शेअर केले होते. त्यात आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन, असे त्यांनी म्हटले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर राऊत यांच्या आरोग्याबद्दल चिंतेची भावना व्यक्त होत असताना, त्यांचे कट्टर विरोधक शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.
राऊत लवकर बरे व्हावेत, ही प्रामाणिक इच्छा
शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत सहानुभूती व्यक्त केली. “संजय राऊत आजारी असल्याची बातमी ऐकून मला वाईट वाटले. त्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी, ही माझी मनापासून इच्छा आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक वैर नसते. राजकीय तत्वांचा वाद आहे, माणुसकीचा नाही.”, असे म्हस्के म्हणाले.
प्रतिस्पर्धी आहेत पण, शत्रू नाहीत
राजकारणात भूमिका वेगळ्या असतात, पण कोणाचं वैयक्तिक नुकसान व्हावं, अशी भावना कधीच नसते. राऊत हे आमचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत, शत्रू नाहीत. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. ते आजारी आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर बोलणे योग्य नाही. सध्या सगळ्यांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा द्याव्यात आणि त्यांच्याभोवती सकारात्मक वातावरण निर्माण व्हावं, हेच योग्य आहे, असे म्हस्के म्हणाले.
