ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीकडून आज, गुरुवारी सायंकाळी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनालाही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही आंदोलनांना परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यात यावी, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार होते.

दुसरीकडे, विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला आणि आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. त्यांनाही पोलीसांनी परवानगी नाकारली. ठाकरे गटाला आंदोलनाला परवानगी मिळाली नसली, तरी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात येऊन प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.