ठाणे : दिव्यातील नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेले ई – शौचालये ठाणे महापालिकेने तोडले असून यावरूनच आता दिव्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरूनच हे शौचालये तोडण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर, शिवसेनेने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच निविदेत मंजुर नसलेल्या जागेवर शौचालय उभारले नसल्यामुळे पालिकेने कारवाई केली असावी असे सांगत पालिकेची कारवाई असल्यामुळे तेच कारवाई मागचे कारण सांगू शकतील, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
दिव्यातील नागरिकांसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आलेले ई – शौचालये उभारण्यात आले होते. या शौचालयाचे बांधकाम पालिका प्रशासनाने बुधवारी तो़डून टाकले. या कारवाईनंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत.
दिवा शहरात नागरिकांसाठी एकही सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही. शिवसेनेने एकही सार्वजनिक शौचालय बांधले नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपने यासाठी पुढाकार घेतला होता. आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून हे ई – शौचालये उभारण्यात आले होते. मात्र शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मढवी यांना हा प्रकार खटकला. त्यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई करण्यात आल्याचा आऱोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे.
रमाकांत मढवी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. निवदेतील मंजूर जागेवर शौचालय असते तर ते तोडण्याची पालिकेची हिंमत झाली असती का, असा प्रश्न करत निविदेत मंजूर नसलेल्या जागेवर शौचालय उभारले नसल्यामुळे ही कारवाई झाली असावी. मात्र, पालिकेने ही कारवाई केली असल्यामुळे तेच कारवाई मागचे कारण सांगू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.