ठाणे – घोडबंदरच्या मानपाडा भागातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. या हत्येनंतर त्यांच्या समाजमाध्यमावरील शेवटची पोस्ट चर्चेत आली आहे. एका बांधकाम प्रकल्पाविरोधात उपोषण करणार असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे पत्रही पोस्ट केले होते. याच पोस्टमध्ये ‘मौत का सौदागर’ असा उल्लेख केल्याने हत्येनंतर या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे.
घोडबंदरच्या मानपाडा भागातील शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. प्रदीप पूर्णेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असायचे. नेहमी फेसबुक या समाजमाध्यमावर त्यांचे व्हिडीओ, माहिती शेअर करत असे. त्यामुळे फेसबुकवर त्यांचे १३ हजाराहून अधिक फाॅलोवर्स होते. त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ते परिसरात ओळखले जात होते. प्रदीप पूर्णेकर यांनी २९ सप्टेंबर रोजी ही पोस्ट केली होती.
एका बांधकाम प्रकल्पाविरोधात एकता गाव बचाव कृती समितीच्या माध्यमातून उपोषण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले होते. या उपोषणासाठी कापूरबावडी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार, गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर १० ऑक्टोबरपर्यंत उपोषणास परवानगी देता येणार नसल्याचे कळविण्यात आले होते. पोलिसांचे हे पत्र पूर्णेकर यांनी समाजमाध्यमावरील पोस्टसोबत शेअर केले.या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा करत ‘मौत का सौदागर’ असा उल्लेख केला होता. पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर ही पोस्ट समाज माध्यमानावर वायरल झाली आहे. हत्येच्या दिवशी केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.
पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र, समाजमाध्यमावरील पोस्ट आणि पूर्णेकर यांच्या हत्येचा थेट संबंध आहे का, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
