Thane Shiv Sena leader Pradeep Purnekar murder: मानपाड्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या वेळी कार्यालयात व त्यानंतर प्रदीप यांना रुग्णालयात नेताना हजर असलेला त्यांचा मित्र पप्या शिंदे हा कटात सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. ते कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक मंदार घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबार व धारदार शस्त्राने वार करून पूर्णेकर यांची हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीच्या जबाबात नमूद करण्यात आले असून या तक्रारीत त्यांचा मित्र पप्या शिंदे यानेच हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या प्राथमिक तपासातही ही बाब उघड येताच त्याला अटक करण्यात आली.
नेमके काय घडले?
मंदार घोडके यांनी कापूरबावडी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते पूर्णेकर यांच्या कार्यालयात मित्र राहुल जैस्वाल यांच्यासह होते. त्यावेळी पप्या शिंदे कार्यालयात आला. पूर्णेकर व शिंदे यांनी दोघांना बाहेर जाण्याचा इशारा केल्यानंतर घोडके व जैस्वाल कार्यालयाबाहेर आले. त्यानंतर कार्यालयाजवळ काही संशयित व्यक्ती आल्याचे घोडके यांनी पाहिले. त्यात संतोष कनोजिया उर्फ टल्ली, निखिल यादव उर्फ शूटर यादव, चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधलेली एक व्यक्ती व हेल्मेट घातलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. त्यानंतर कार्यालयातून गोळीबाराचा आवाज ऐकू आला, असे घोडके यांनी तक्रारीत म्हटले आहे.
गोळीबारानंतर घोडके व जैस्वाल कार्यालयात गेले असता पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यावेळी पप्या शिंदे त्यांच्याजवळ होता व त्याच्या कपड्यांवर रक्त लागले होते. त्यानंतर पूर्णेकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असेही तकारी म्हटले होते.
कटातील सहभाग उघड
पूर्णेकर यांना रुग्णालयात नेल्यानंतरही पप्या शिंदे तेथे आला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही जखमा दिसल्या नाहीत. शिंदेसह संतोष कनोजिया, निखिल यादव व अन्य दोन व्यक्तींविरोधात संगनमत करून पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांच्या आधारे व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पप्या शिंदे यापूर्वीही तडीपार
प्रदीप पूर्णेकर व पप्या शिंदे हे दोघे मित्र होते. सहा महिन्यांपूर्वी काही कारणांमुळे ते वेगळे झाले होते. ते एकमेकांशी बोलत नव्हते. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोघे एकत्र आले होते. पप्या याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल असून त्याला यापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. प्रदीप यांच्या हत्येवेळी पप्या हा कार्यालयात व त्यानंतर रुग्णालयात उपस्थित होता. त्याच्या काही हालचाली संशयास्पद वाटल्याने आणि नातेवाईकांनी आरोप केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती ठाण्याचे सह पोलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.
