ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून तसेच धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार तसेच गृहखात्यावर तीव्र टीका केली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा स्थानिक राजकीय संघर्ष सुरू होता आणि ते मनोरमानगर परिसरातील बिल्डर लॉबी तसेच ड्रग्स नेटवर्कविरोधात सातत्याने आवाज उठवत होते, असा दावा राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येवर संताप व्यक्त केला. “प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली, गृह खात्याचे हे धिंडवडे आहेत,” अशी टीका त्यांनी केली. शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात पूर्णेकर यांचा राजकीय संघर्ष सुरू होता, असा दावा करत राऊत यांनी मनोरमानगर परिसरातील कथित बिल्डर लॉबी आणि ड्रग्स नेटवर्कविरोधात पूर्णेकर सातत्याने आवाज उठवत असल्याचेही म्हटले आहे. “त्याची किंमत त्यांनी जिवाचे मोल देऊन चुकवली आहे,” असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

ठाणे शहर गुन्हेगार आणि ड्रग्स माफियांचे आश्रयस्थान बनत असल्याचा आरोप करत राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीसांचे हे अपयश असून ठाणेकरांचे भविष्य अंधारात ढकलले आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच प्रदीप पूर्णेकर यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला असून, लढवय्या शिवसैनिकाला दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यातील मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री मनोरमानगर परिसरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही वार केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

हल्ल्यामागील नेमके कारण, हल्ल्याचे नियोजन आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. पूर्णेकर हे स्थानिक नागरी प्रश्नांवरही सक्रिय होते. परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि विविध मुद्द्यावर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून, या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींचा सहभाग तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे ठाण्यातील कायदा-सुव्यवस्था आणि स्थानिक राजकीय संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.