ठाणे : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याने अनेक ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मीटरमधील तांत्रिक बिघाडामुळे बिल वाढले की घरातील विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने अधिक वीज खर्च झाली, हे कसे ओळखायचे? या प्रश्नांची उत्तरे आता मोबाइलवर उपलब्ध होणाऱ्या वीजवापराच्या नोंदींतून शोधता येऊ शकतात. स्मार्ट मीटरमुळे वीजवापराची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध होत असल्याने बिलाची पडताळणी करणे आणि वीजवापरातील अनपेक्षित बदल लक्षात घेणे शक्य होते. मात्र, प्रत्येक तांत्रिक बिघाड किंवा दोषपूर्ण उपकरणाची ओळख केवळ मीटरच्या नोंदींवरूनच होईल, असे नाही. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नौपाड्यातील परिसंवादात नागरिकांना माहिती दिली.
अभिनय कट्ट्याच्या वतीने ‘स्मार्ट मीटर : शाप की वरदान?’ या विषयावर शनिवारी नौपाडा येथील अभिनय कट्टा येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मसने आणि सहाय्यक अभियंता किशोर सावरकर यांनी स्मार्ट मीटरविषयी नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले.
यावेळी स्मार्ट मीटर हे अदाणी कंपनीचे असून ते वेगाने चालतात आणि त्यामुळे वीजबिल वाढते, असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला आहे. मात्र, हे मीटर महावितरणचे आहेत. पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटरमध्ये सिमकार्डच्या माध्यमातून वीजवापराच्या नोंदी महावितरणपर्यंत पोहोचविण्याची सुविधा आहे. त्यामुळे मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्याला प्रत्येक वेळी प्रत्यक्ष जाऊन नोंद घेण्याची गरज कमी होते. स्मार्ट मीटर वेगाने चालतात, हा समज चुकीचा असल्याचे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मसने यांनी स्पष्ट केले.
तसेच सहाय्यक अभियंता किशोर सावरकर यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरमधील सुविधेमुळे कोणत्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे, याची माहिती महावितरणला मिळण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक वेळी नागरिकांनी दूरध्वनी करून वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती देण्याची गरज भासणार नाही. स्मार्ट मीटर बसविण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आल्यास त्यांच्या ओळखपत्राची खात्री करावी. कर्मचाऱ्याच्या अधिकृततेबाबत शंका असल्यास नोटिशीवर दिलेल्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधून पडताळणी करता येते. मीटर बदलण्यासाठी किंवा वीजपुरवठा खंडित करण्यासारख्या कामांसाठी कर्मचारी येत असताना त्यांच्याबाबत गैरसमज करून घेतला जातो. थकीत वीजबिलामुळे मीटर काढण्याची कारवाई होऊ शकते; मात्र प्रत्येक वेळी मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याचा उद्देश चुकीचा असतो, असे समजणे योग्य नाही.
वीजबिल वाढल्यास काय करावे?
वीजबिल नेहमीपेक्षा अधिक आल्यास ग्राहकांनी बिल कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंतच्या वीजवापरासाठी आले आहे, हे पाहावे. मागील बिलांच्या तुलनेत युनिट्समध्ये किती वाढ झाली आहे, हे तपासावे. पंखे, फ्रिज, वातानुकूलन यंत्र, पाण्याचा पंप आणि अन्य उपकरणांचा वापर वाढला आहे का, हे पाहावे.
वीजवापरात अनपेक्षित वाढ दिसल्यास संबंधित उपकरणांची तपासणी करून घ्यावी. कारण स्पष्ट होत नसल्यास वीज वितरण कंपनीकडे तक्रार करून बिलाची किंवा मीटरची तपासणी करण्याची मागणी करावी.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचा फायदा काय?
दिवसा सौरऊर्जेमुळे महावितरणला वीज कमी पैशात उपलब्ध होते. त्यामुळे महावितरण याचा फायदा ग्राहकांना करून देत आहेत. यासाठी १ एप्रिल २०२६ पासून घरगुती स्मार्ट मीटरधारकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८५ पैशांची सवलत लागू झाली आहे. तसेच महाविद्युत या ॲपमुळे बिलिंगचा चुका होणार नाहीत. सर्व डेटा ते ऑफिसमध्ये येतो. विज बिलाचे रीडिंग घरबसल्या मोबाईलवर दिसेल. प्रत्येक वेळेनुसार कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात आला आहे कशासाठी वापर करण्यात आला आहे ते तारखेनुसार चेक करता येऊ शकते. स्मार्ट मीटरमुळे वीजवापराच्या नोंदी उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना आपल्या वीजवापरावर लक्ष ठेवणे आणि वेळेत बिल भरणे अधिक सोयीचे होत असल्याचेही सावरकर यांनी सांगितले.
वीजबिलाची स्वतंत्रपणे पडताळणी कशी करावी?
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल अचूक येते का, याची ग्राहकांना स्वतंत्रपणे पडताळणी करता येईल का, असा प्रश्न परिसंवादात उपस्थित करण्यात आला. त्यावर अधिकाऱ्यांनी वीजबिलावरील रीडिंगच्या तारखा, वापरलेल्या युनिट्सची संख्या, लागू वीजदर आणि एकूण रक्कम तपासण्याचे आवाहन केले. बिल मिळाल्याची तारीख आणि मीटर रीडिंगचा कालावधी यांची गल्लत झाल्यामुळेही ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ बिलाची रक्कम पाहण्याऐवजी बिलिंगचा कालावधी आणि प्रत्यक्ष वीजवापर तपासणे महत्त्वाचे आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली?
स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया २०१८ पासून सुरू झाली असून, केंद्र सरकारने २०२२-२३ मध्ये जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत निर्णय घेतल्याची माहिती परिसंवादात देण्यात आली. सिमकार्डच्या माध्यमातून माहिती पाठवू न शकणारे जुने मीटर बदलण्यावर भर देण्यात आला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संबंधित नियमांमध्ये तरतूद असून, त्यानुसार मीटर बदलण्याची प्रक्रिया राबविली जात असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांसाठी प्रात्यक्षिकाची मागणी
स्मार्ट मीटरमधील वीजवापराचा तपशील मोबाइलवर कसा पाहायचा, वीजबिलाची पडताळणी कशी करायची आणि वीजवापरात अचानक वाढ झाल्यास कोणत्या बाबी तपासायच्या, याचे प्रात्यक्षिक नागरिकांना देण्याची मागणी परिसंवादात करण्यात आली. पुढील बैठकीत या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. पुढील बैठक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे.
