ठाणे : ठाण्यातील एका उद्योग कंपनीने बिल भरूनही वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार समोर आला आहे. देय तारखेनंतर अवघ्या चार दिवसांत स्मार्ट मीटरद्वारे वीज कापली गेली. यानंतर वीज बिल भरूनही तब्बल ३० तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या मुद्द्यावरून ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने स्मार्ट मीटरच्या भोंगळ कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वीज वितरण कंपनीच्या या यंत्रणेवर शंका उपस्थित करत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

ठाण्यातील तलवार कंपाऊंड येथील एका उद्योगाचा वीजपुरवठा बिलाच्या देय तारखेनंतर अवघ्या चार दिवसांत स्मार्ट मीटरद्वारे आपोआप बंद करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित ग्राहकाने तातडीने बिलाची रक्कम एनईएफटीद्वारे भरली. मात्र, पैसे भरूनही वीजपुरवठा सुरू झाला नाही. ग्राहकाने वीज वितरण कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. स्थानिक कार्यालयाशीही संपर्क साधण्यात आला. मात्र, त्याला तातडीने मदत मिळाली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित ग्राहकाने ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनकडे धाव घेतली. या तक्रारीनंतर असोसिएशनने ठाणे परिमंडळातील कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला. वारंवार पाठपुरावा करूनही वीजपुरवठा सुरू न झाल्याने हे प्रकरण ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यापर्यंत नेण्यात आले. अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास वीजपुरवठा सुरू करण्यात आला. म्हणजेच वीज बंद झाल्यापासून तब्बल ३० तास ग्राहकाचा वीज पुरवठा बंद होता. याबाबत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे सरचिटणीस भावेश मारू यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तक्रार केली आहे.

पैसे भरले, तरीही वीज नाही

संबंधित ग्राहकाने एनईएफटीद्वारे बिल भरले. मात्र, पैसे भरल्यानंतरही वीज सुरू झाली नाही. ग्राहकाने वीज वितरण कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. मात्र तातडीने मदत मिळाली नाही. असोसिएशनने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर तब्बल ३० तासांनी वीज सुरू झाली, असा आरोप मारू यांनी केला. या प्रकरणात ग्राहकाला वीज वितरण कंपनीच्या मोबाइल ॲपवरून पुन्हा पैसे भरण्याचा सल्ला देण्यात आला. आधीच पैसे भरले असताना पुन्हा पैसे का भरायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उत्पादन थांबल्याने आर्थिक नुकसान

वीज बंद असल्याने उद्योगाचे काम ठप्प झाले. सुमारे ८१० मनुष्य-तासांचे कामाचे नुकसान झाले. उत्पादन थांबल्याने आर्थिक नुकसान झाले आणि ग्राहकांना माल देण्याच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला, असा दावा मारू यांनी केला आहे.

असोसिएशनचा इशारा, लेखी स्पष्टीकरणाची मागणी

वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना दिली होती का, स्मार्ट मीटर वीज आपोआप कशाच्या आधारावर बंद करतो, पैसे भरल्यानंतर वीज लगेच का सुरू झाली नाही आणि वीज सुरू करण्यासाठी ३० तास का लागले, याचे लेखी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी मारू यांनी केली आहे.

‘बिल भरूनही वीज बंद होत असेल, तर स्मार्ट मीटरचा फायदा काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. समाधानकारक स्पष्टीकरण मिळेपर्यंत उद्योगांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याला पाठिंबा देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.