खेळ मैदान : संतोष अकादमीला विजेतेपद

या स्पर्धेचे आयोजन आधारवाडी येथील मैदानात करण्यात आले होते.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरूअसलेल्या कै.विशाल भोईर यांच्या स्मरणार्थ कल्याण प्रीमियर लीग स्मृती चषक २०१६ या २०-२० क्रिकेट स्पर्धेत संतोष अकादमी संघाने विजेतेपदाचा मान पटकाविला आहे. या स्पर्धेचे आयोजन आधारवाडी येथील मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना बॉयस सीसी क्लब डोंबिवली व संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी यांच्यात झाला, या अंतिम सामन्यात बॉयस सीसी ने २० षटकांत ९६ धावा करण्याचे आव्हान दिले. मात्र संतोष अकादमीने हे लक्ष्य सहज गाठत १६ षटकांत ९७ धावा केल्या व पहिल्या कल्याण प्रीमियर लीगमध्ये विजेते होण्याचा मान पटकवला. मनन बट याने ४३ धावांची अप्रतिम खेळी करत स्पर्धेत ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब पटकवला. विजेत्या संघास शिवसेना कल्याण प्रमुख विश्वनाथ भोईर याच्या हस्ते चषक देण्यात आला. त्याप्रसंगी जयवंत भोईर, आयोजक संतोष पाठक, भाजप महिला आघाडीच्या अंजु अरोरा, संतोष अकादमी संघाचे प्रशिक्षक विवेक मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रो टेबल टेनिस क्लबला दुहेरी मुकुट

यजमान प्रो टेबल टेनिस क्लबने प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळवत ज्युनियर आणि सीनियर गटात बाजी मारत पहिल्या ठाणे जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या सांघिक लढतींमध्ये दुहेरी मुकुट संपादन केला. ज्युनियर गटात वर्चस्व राखताना प्रो टेबल टेनिस संघाने फादर अग्नेल संघाचा ३-१ असा पराभव केला. ऑलिम्पिक पद्धतीनुसार खेळवण्यात आलेल्या लढतीतील पहिल्या सामन्यात अनिरुद्ध मराठेने दिशा हुलावलेचा पराभव करत प्रो टेबल टेनिस संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात सिद्धेश सावंतने रंगतदार लढतीत अजयसिंग पाटीलचा पराभव करून संघाची आघाडी  २-० अशी वाढवली. प्रो टेबल टेनिस संघ सहज विजेतेपद मिळवणार असे वाटत असताना तिसऱ्या सामन्यात फादर अग्नेलच्या तेजस कांबळे आणि दिशा हुलावलेने दुहेरीच्या लढतीत सिद्धेश सावंत आणि ऋषभ साळसकर या जोडीचा पराभव करत सामन्यातील रंगत वाढवली. चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात अनिरुद्ध मराठेने तेजस कांबळेवर मात करत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सीनियर गटाच्या अंतिम फेरीत सनिश आंबेकरने पार्थ फणसेकरचा पराभव करत बुस्टर क्लब (अ) संघाच्या विजयाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात मयुरेश केळकरने झुबिन तारापोरवालाचा पराभव करत प्रो टेबल टेनिस क्लबला १-१ अशी संधी साधून दिली. त्यानंतर दुहेरीच्या  सामन्यात मयुरेश केळकर आणि अनिरुद्ध मराठेने अरबाझ शेख आणि झुबीन तारापोरवाला या जोडीचा  पराभव करून संघाच्या आघाडीत भर टाकली. परतीच्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात अनिरुद्धने सनिश आंबेकरवर सरशी मिळवत प्रो टेबल टेनिस क्लबला दुहेरी मुकुट मिळवून दिला. प्रो टेबल टेनिस क्लबचे अध्यक्ष आणि ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अग्रज्ञेय व्यायामशाळेचा महिला संघ बास्केटबॉल स्पर्धेत अव्वल

चेंबूर वायएमसीएतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत डोंबिवली येथील अग्रज्ञेय व्यायमशाळेच्या महिला गटाने विजेतेपद पटकावले आहे. २१ मे रोजी चेंबूर येथील वायएमसीए या मैदानात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महिला गटात आठ संघ सहभागी झाले होते. महिला संघाचे प्रशिक्षक आनंद फडके यांनी संघाचे कौतुक करून खेळाडूंनी अजून मेहनत करावी असे सांगितले.

वसंत विहार हायस्कूल अजिंक्य

नुकत्याच पार पडलेल्या घोष चषक स्पर्धेत ठाण्यातील वसंत विहार हायस्कूलने विजेतेपद मिळवले.  आझाद मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चौदा वर्षांखालील खेळाडूंमध्ये चुरस रंगली होती. वसंत विहार हायस्कूल आणि युनियन क्रिकेट क्लब या संघांमध्ये अंतिम सामना खेळविण्यात आला. युनियन क्लब संघाचा १८ धावांनी पराभव करत वसंत विहार हायस्कूलने विजय मिळविला. वसंत विहार संघाचा वेदांश सिंगने संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. वसंत विहार हायस्कूलने १८.१ षटकांत ९४ धावा तर युनियन क्लबने १८.३ षटकांत ७६ धावा फटकाविल्या.

पॉवर लििफ्टग स्पर्धेत रुपेश तर महिला गटात नेहा भोसलेची बाजी

३७ व्या ठाणे जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुरुष गटात रुपेश पवार तर सीनियर महिला गटात नेहा भोसले हिने बाजी मारली. गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील ८० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. फिटनेस मॅनेजमेंट संस्थेचा सदस्य असणाऱ्या रुपेशने ६५० किलो गटात हे यश मिळविले. तसेच नेहाने ४२२.५ या वजनी गटात हे यश मिळविले आहे. नेहा ही गोवेली येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

खुल्या बेंच प्रेस स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस विभागातील रामदास खरात यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. १७७.५ किलो गटात त्यांनी कामगिरी बजावली आहे. वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक गटातही ठाण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट सांघिक गटात ठाणे ग्रामीण पोलीस गटाने अजिंक्यपद मिळविले. त्यांनी कमावलेल्या ४९ गुणांमुळे त्यांना हा किताब मिळाला. यांसह महिला गटात रंगलेल्या चुरशीच्या स्पर्धेत गोवेलीतील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद मिळविले. त्यांना मिळालेल्या एकूण ४२ गुणांच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळविला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane sport event

ताज्या बातम्या