ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शिवशाही बसगाडीने पेट घेतल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. यानंतर ठाण्यातील कोकण रहिवासी संघाच्या कोकण फर्स्ट फाऊंटेशन संघटनेने एसटी बसगाड्यांची अग्नि सुरक्षा तपासणीची मागणी केली आहे. यासंदर्भाचे पत्र त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठविले आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस पुलावर काही दिवसांपूर्वी शिवशाही बसगाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत प्रवासी बचावले. परंतु अगीनंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मे महिन्यात सुट्ट्याचा कालावधी असल्याने मुंबई, ठाण्यातील अनेक कुटुंब पर्यटनासाठी कोकण किंवा गावी जात असतात.

आगीच्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ठाण्यातील कोकण फर्स्ट फाऊंडेशनचे संतोष निकम आणि प्रितेश मोरे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार केला. सध्या तापमान ४० ते ४५ अंशापर्यंत जात आहे. त्यामुळे पु्न्हा एसटीला आग लागल्याची घटना घडू नये यासाठी उपाययोजना करुन अग्नि सुरक्षा तपासणीचे नियोजन करावे, असे पत्रात म्हटले आहे.