ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाजवळील राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) थांब्यावरील दुरावस्थेवरुन शुक्रवारी ठाकरे गटाने आंदोलन केले. या एसटी डेपोत दारुच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. येत्या १५ दिवसांत या डेपोत सुधारणा झाल्या नाही तर शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल असा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ एसटीचा थांबा आहे. या थांब्यावरून भिवंडी, बोरीवली, पालघर, वसई या भागात एसटीच्या शेकडो फेऱ्या होतात. परंतु या थांब्यावर सोयी-सुविधा नाहीत, अशा तक्रारी प्रवासी करतात. शुक्रवारी सकाळी ठाकरे गटाने या थांब्याची पाहणी केली. पाहणी दरम्यान प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची वानवा, अपुऱ्या प्रमाणात पंखे आणि आसन व्यवस्था नसल्याचे समोर आले. थांब्याच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. अतिशय दुर्गंधीयुक्त असलेल्या महिला शौचालयात बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारले जात असल्याचे निदर्शनास येताच, ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पैसे घेणे बंद करण्याचे आदेश दिले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ”स्मार्ट कार्ड” काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत असून, त्यासाठी वाढीव पैसे उकळले जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
टेस्ला गाडी खरेदीला वेळ, पण एसटीच्या सुधारणेसाठी नाही
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. पंतप्रधान मोदी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे आवाहन करतात, मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारने तिकिटांमध्ये अनुदान दिले पाहिजे असे ते म्हणाले. ठाण्याला दोन मंत्रीपदे मिळाली, त्यापैकी एक परिवहन मंत्री आहेत. त्यांना ”टेस्ला” गाडी खरेदी करण्यासाठी वेळ आहे, पण एसटीच्या सुधारणेसाठी वेळ नाही. एसटी महामंडळाचे भूखंड बांधकाम व्यवसायिकांच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू आहे असा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील मंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी आधी स्वतःच्या आलिशान गाड्यांचे चोचले बंद करावेत. जर त्यांच्यात जराही हिंमत असेल, तर त्यांनी सर्वसामान्यांप्रमाणे ”एसटी” बस, लोकल ट्रेन आणि ”बेस्ट”ने प्रवास करून दाखवावा. जोपर्यंत हे सत्ताधारी आपल्या वातानुकूलित गाड्यांमधून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत त्यांना एसटी कर्मचारी आणि महागाईच्या खाईत होरपळणाऱ्या सामान्य जनतेचे खरे हाल कधीच समजणार नाहीत.
सध्याचे सरकार केवळ स्वतःच्या प्रसिद्धीचे स्टंट करण्यात मग्न असून, सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष या एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या लढ्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि शेवटपर्यंत लढत राहील असे ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे म्हणाले.
