ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील नौपाडा भागात वाहतुक कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले. हे वाहतुक बदल ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू असतील अशी माहिती ठाणे वाहतुक पोलिसांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गोखले रोड येथून महर्षी कर्वे मार्गे, बेडेकर रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गावर रिक्षा आणि दुचाकींची सर्वाधिक वाहतुक होते. या परिसरातून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या पादचाऱ्यांचीही वर्दळ असते. मार्ग अरुंद असल्याने अनेकदा वाहतुक कोंडी होते. तसेच अपघाताची भिती देखील व्यक्त केली जाते. या भागातील वाहतुक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.

गोखले रोड, महर्षी कर्वे रोड येथून बेडेकर रुग्णालयाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गोखले रोडजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गोखले रोडने गावदेवी मैदान मार्गे वाहतुक करतील. हे वाहतुक बदल १८ एप्रिलपासून ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आले आहेत. या वाहतुक बदला संदर्भात हरकती, सूचना असल्यास सूचना लेखी स्वरुपात ठाणे शहर वाहतुक शाखेच्या ठाणे येथील तीन हात नाका कार्यालयात पाठविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. हरकती आणि सूचना प्राप्त झाले नाही तर हे वाहतुक बदल पुढील आदेश येईपर्यंत कायमस्वरुपी राहतील.