ठाणे : दिवा येथे एका भटक्या श्वानाच्या हल्ल्यात दोन वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली. तिला श्वानाने तीन ते चार ठिकाणी चावा घेतला असून या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाले आहे. महापालिकेकडे तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने भटक्या श्वानांना महापालिका कार्यालयात सोडू असा इशारा शिवसेनेने (ठाकरे गट) दिला आहे.

दिवा येथील म्हात्रे गेट परिसरातील एका इमातीमध्ये दोन वर्षाची मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. शुक्रवारी सायंकाळी तिला इमारतीतील एक लहान मुलगा खेळण्यासाठी नेत होता. त्याचवेळी भटके श्वान मागून त्यांच्या दिशेने आले. श्वानाने मुलीवर हल्ला केला. त्यामुळे घाबरलेला मुलगा तेथून निघून गेला. त्यानंतर भटक्या श्वानाने मुलीला चावा घेण्यास सुरुवात केली.

हल्ल्यात मुलगी जखमी झाली. मुलीच्या चेहऱ्यावरही मार लागला आहे. घटनेची माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिच्यावर उपचार झाले असून तिला तीन ते चार ठिकाणी श्वानाने चावा घेतल्याची माहिती मुलीच्या वडिलांनी दिली. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. इमारतीच्या आवाराजवळ ही घटना घडल्याने त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्राप्त झाले असून ते समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. श्वानाच्या हल्ल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठाकरे यांच्या शिवसेनेचा इशारा

या घटनेनंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, दिवा विभागात भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे, हे मान्य केले जाणार नाही. जर महापालिकेने तात्काळ भटके श्वान पकडण्याची व त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके श्वान गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.