ठाणे – आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मोठ्या प्रमाणावर वापरले जात असले तरी त्यामध्ये “मानवी स्पर्श” कमी असल्याची टीका केली जाते. मात्र, नवी मुंबईतील बारावीचा विद्यार्थी जीत भास्कर याने विकसित केलेल्या ‘ब्रॉनटो एआय’ या ॲपमुळे ही कमतरता भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हे एआय केवळ माहिती देत नाही तर वापरकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यानुसार प्रतिसाद देण्याची क्षमता ठेवते असे जीतने सांगितले आहे.
जीत संतोष भास्कर हा नवी मुंबईतील खारघर येथे राहतो. त्याने बारावी मध्ये असताना मानवी भावना ओळखणारे तंत्रज्ञान ‘ब्रॉनटो एआय’ हे ॲप तयार केले आहे. त्याने तयार केलेले ‘ब्रॉनटो एआय’ हे इमोशन-बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्याच्या बोलण्यातील टोन, भावना आणि संदर्भ ओळखून उत्तर देते. वापरकर्ता रागात, दुःखात किंवा आनंदात बोलत असल्यास एआय त्यानुसार प्रतिक्रिया देतो. विशेषतः ऑडिओ संवादामध्ये आवाजातील चढ-उतार ओळखून योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता या एआयमध्ये आहे. तसेच सध्या अनेक मोठ्या कंपन्यांचे एआय प्रगत असले, तरी त्यात मानवी स्पर्शाचा अभाव आहे. लोकांना एआय वापरणे सोपे आणि भावनिकदृष्ट्या जवळचे वाटावे, या उद्देशाने ‘ब्रॉनटो एआय’ विकसित केले असल्याचे जीतने सांगितले.
संवादात सातत्य आणि वैयक्तिक कनेक्शन
या एआयची खासियत म्हणजे तो वापरकर्त्याशी झालेल्या आधीच्या संवादाचा संदर्भ लक्षात ठेवतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या वापरकर्त्याने आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिली असेल, तर पुढील संभाषणात एआय त्याबद्दल चौकशी करतो. त्यामुळे वापरकर्त्याला एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याचा अनुभव मिळतो.
मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त
आजच्या काळात वाढत्या नैराश्याच्या पार्श्वभूमीवर हे एआय महत्त्वाची भूमिका बजावू शकते. वापरकर्ता दुःखी किंवा तणावात असल्यास, एआय त्याला समजावून सांगतो, धीर देतो आणि सकारात्मक उपाय सुचवतो. लोकांना कोणाशी बोलायची गरज असते तेव्हा हे एआय त्या गरजेची पूर्तता करू शकते, असे जीतने स्पष्ट केले.
संशोधनावर आधारित विकास
हे एआय तयार करण्यासाठी जीतने न्यूरोसायन्स आणि मानवी वर्तनावर आधारित अनेक संशोधनपत्रांचा अभ्यास केला. लोकांशी प्रेमाने संवाद साधला तर तेही सकारात्मक प्रतिसाद देतात, यावर आधारित एआयचे प्रशिक्षण केले आहे, असे तो सांगतो.
डेटा सुरक्षेला प्राधान्य
डेटा लीकच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रॉनटो एआय’मध्ये वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. एन्क्रिप्टेड सिस्टमद्वारे डेटा सुरक्षित ठेवला जातो आणि वैयक्तिक माहिती लीक होणार नाही याची खात्री दिली जाते.
शेतकऱ्यांसाठी ‘MSP कनेक्ट’ ॲप
जीतने शेतकऱ्यांसाठी ‘MSP कनेक्ट’ नावाचे ॲपही विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) समजते. तसेच आपल्या पिकाचा नफा किंवा तोटा किती झाला हेही सहज कळते. भविष्यात हवामानाचा अंदाज देणारे फीचर्सही यात समाविष्ट करण्याचा त्याचा मानस आहे.
सरकारकडून अपेक्षा
या उपक्रमाला अधिक व्यापक करण्यासाठी सरकारकडून पाठबळ मिळणे गरजेचे असल्याचे जीत आणि त्याचे वडील संतोष भास्कर यांनी सांगितले. अशा नवकल्पनांना प्रोत्साहन, आर्थिक मदत आणि जनजागृती मिळाली तर देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागू शकतो, असे ते म्हणाले.
कुटुंबाचा अभिमान
जीतच्या या यशाबद्दल त्याच्या कुटुंबीयांनी अभिमान व्यक्त केला आहे. केवळ सहा महिन्यांत त्याने स्वतःच्या मेहनतीवर हे तंत्रज्ञान विकसित केले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.
