चंदिगड येथे भरवण्यात आलेल्या २३ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत ठाण्यातील बाल वैज्ञानिकांच्या दोन प्रकल्पांचा सवरेत्कृष्ट प्रकल्प म्हणून गौरव करण्यात आला आहे. देशभरातून दाखल झालेल्या ६५८ प्रकल्पांमधून सवरेत्कृष्ट ठरलेल्या १६ प्रकल्पांमध्ये या दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये श्रीरंग विद्यालय आणि ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

यंदा ‘समजून घेऊ या हवा आणि हवामान’ हे या परिषदेचे मध्यवर्ती संकल्पना होती. ठाण्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या संकल्पनेवर आधारित प्रकल्प तयार करून या परिषदेमध्ये सहभाग नोंदवला होता. यापैकी राज्यस्तरीय प्रदर्शनातून निवड करण्यात आलेल्या प्रकल्पांचा समावेश चंदीगड येथील राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आला होता. ठाणेकर बालवैज्ञानिकांनी आपले प्रकल्प सादर केले होते. असे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाच्या प्रकल्पाचा विषय ‘हवेतील घटकांचा जलीय परिसंस्थेवर होणारा परिणाम व त्यावरील उपाययोजना’ हा  होता. अमोल पाटील याच्या नेतृत्वाखाली ऋतुजा पाटील, कोमल साळुंखे, अरबाज शेख, लौकिक साळुंखे या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकारला होता. तर ए. के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘हवेतील आद्र्रता आणि अन्नधान्य साठवणुकीचा संबंध याचा अभ्यास’ हा होता. अमोघ पाटील याच्या नेतृत्वाखाली ध्रुव देवरे, अनिश हरकरे, प्रथमेश वालावलकर यांनी हे प्रकल्प साकारले.