ठाणे : ठाणे उपविभागांतर्गत ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर या महानगरपालिका क्षेत्रांत गेल्या सहा महिन्यांत तब्बल १४६ आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अकस्मात मृत्यूच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या केलेल्यांमध्ये ३० वर्षांखालील तब्बल ७६ जणांचा समावेश असून, त्यापैकी १८ वर्षांच्या वयोगटातील १५ जण आहेत. त्यामुळे तरुण वयात आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

ठाणे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांतील अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात एकूण २३१ अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी १४६ प्रकरणे आत्महत्येची आहेत. म्हणजेच नोंद झालेल्या अकस्मात मृत्यूच्या प्रकरणांपैकी मोठा आकडा आत्महत्यांचा असल्याचे समोर आले आहे. अहवालात मृत्यूचे कारण, संबंधित व्यक्तीचे वय, पोलीस ठाणे आणि मृत्यूचा प्रकार यासह विविध तपशील नमूद करण्यात आले आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत नोंद झालेल्या २३१ अकस्मात मृत्यूंपैकी १४६ मृत्यू आत्महत्येचे असल्याने हा आकडा निश्चितच गांभीर्याने घेण्यासारखा आहे.

उर्वरित प्रकरणांमध्ये अपघाती मृत्यू, बुडणे, विद्युतप्रवाहाचा धक्का, भाजणे, डोक्याला झालेल्या दुखापतीसह अन्य कारणांचा समावेश आहे. अहवालातील अनेक प्रकरणांमध्ये रासायनिक विश्लेषण किंवा इतर वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. आत्महत्येच्या १४६ प्रकरणांमध्ये गळफास घेण्याच्या घटनांची संख्या मोठी असल्याचेही अहवालातील नोंदींवरून दिसते. त्याचबरोबर विषप्राशन, बुडणे आदी कारणांचाही काही प्रकरणांमध्ये समावेश आहे. त्यामुळे आत्महत्येची कारणे आणि त्यामागील सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक तसेच मानसिक घटकांचा स्वतंत्रपणे विचार करणे ही महत्वाचे ठरत आहे.

तरुणांचा आकडा मोठा

या आकडेवारीतील सर्वात गंभीर बाब म्हणजे आत्महत्या केलेल्यांपैकी ७६ जण हे ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. म्हणजेच आत्महत्यांच्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे तरुण वयोगटातील आहेत. यामध्ये १८ वर्षांच्या वयोगटातील १५ जणांचा समावेश आहे. त्यामुळे अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुला-मुलींमध्येही आत्महत्येची प्रवृत्ती आढळून येत असल्याने हा विषय केवळ कायदा-सुव्यवस्थेचा न राहता सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

मुंब्रा हद्दीत सर्वाधिक आत्महत्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालातील पोलीस ठाणेनिहाय आकडेवारी पाहता मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ३८ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ श्रीनगर येथे १८, कासारवडवली आणि कळवा येथे प्रत्येकी १६, कापुरबावडी आणि वर्तकनगर येथे प्रत्येकी १२, शिळ डायघर येथे ११, चितळसर आणि वागळे इस्टेट येथे प्रत्येकी ९, तर कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ आत्महत्यांची नोंद झाली आहे. या आकडेवारीतून शहरातील विविध भागांमध्ये आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. चौकट आकडेवारी चिंताजनक

तरुण वय हे शिक्षण, करिअर, रोजगार, नातेसंबंध आणि भविष्यातील स्थैर्य घडविण्याचे महत्त्वाचे वय असते. अशा वयातच ७६ जणांनी जीवन संपविल्याची आकडेवारी समोर येणे ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. विशेषतः १८ वर्षांच्या वयोगटातील १५ आत्महत्या ही बाब अधिक अस्वस्थ करणारी आहे. ठाणे उपविभागातील या सहा महिन्यांच्या आकडेवारीने आत्महत्येचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करीत आहे, याकडे लक्ष वेधले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी केवळ घटना घडल्यानंतरची कारवाई पुरेशी ठरणार नसून, घटना घडण्यापूर्वीच मदत मिळेल अशी सक्षम यंत्रणा, समुपदेशन आणि जनजागृती अधिक व्यापक करण्याची आवश्यकता आहे.

बेरोजगारी, वाढता ताण तणाव, कौटुंबिक वाद आणि यातून निर्माण होणारे सामाजिक ताण यामुळे तरुणांमधून आत्महत्यांचे प्रमाण जास्त दिसून येते. तर १८ वयोगटातील मुलांची आत्महत्या हे नक्कीच चिंताजनक आहे. यामध्ये नशेच्या आहारी जाणे आणि सोशल मीडियाचा वापर जास्त हे देखील एक महत्वाचे कारण दिसून आले आहे. – डॉ. अमित धर्माधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ