ठाणे – एप्रिल महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात संपणारा परीक्षांचा हंगाम यंदा लांबल्यामुळे शहरातील उन्हाळी शिबिरांचे नियोजन कोलमडले आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार अनेक शाळांमध्ये अजूनही परीक्षा सुरू असल्याने शिबिरे आयोजित करणाऱ्या संस्थांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. परिणामी, दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू होणारी शिबिरे यंदा एप्रिल अखेर किंवा मे महिन्यात घेण्याकडे संस्थांचा कल दिसून येत आहे.
उन्हाळी सुट्टी हा मुलांच्या आनंदाचा आणि नव्या गोष्टी शिकण्याचा काळ मानला जातो. या काळात खेळ, कला, विज्ञान आणि निसर्गाशी संबंधित विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. ठाणे शहरातील अनेक शाळा आणि संस्था दरवर्षी अशा उन्हाळी शिबिरांचे आयोजन करतात. मात्र, यंदा परीक्षा उशिरा संपत असल्याने शिबिरे नेमकी कधी घ्यायची? हा प्रश्न आयोजकांसमोर उभा राहिला आहे. काही संस्थांनी वेळापत्रकात बदल करत एप्रिलऐवजी मे महिन्यात शिबिरे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींनी अद्याप तारखा निश्चित केलेल्या नाहीत.
शहरातील ए. के. जोशी इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १४ ते २३ एप्रिल दरम्यान सकाळी ८ ते १०.३० या वेळेत छंदवर्ग आयोजित करण्यात आले आहेत. या वर्गांमध्ये हस्तकला, संगणक, चित्रकला, झुंबा, संगीत यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना टूथपिकपासून वॉल हँगिंग, फ्रिज मॅग्नेट, कागदी मॅश बाउल तयार करणे, ‘स्क्रॅच’द्वारे अॅनिमेशन, तसेच भक्तीगीत शिकवले जात आहे. क्रीडा प्रकारांतून मैदानी खेळांचेही प्रशिक्षण दिले जात आहे.
सरस्वती मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘जंगल धमाल’ या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ ते ६ मे दरम्यान माथेरान येथे होणार आहे. ८ ते १२ वयोगटातील मुलांसाठी आयोजित या शिबिरात जंगलभ्रमंती, झाडे-फुले यांची माहिती, विज्ञान प्रयोग, चित्रकला असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. वाढत्या उष्णतेचा विचार करून निसर्गरम्य ठिकाणाची निवड करण्यात आल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
वनशक्ती संस्थेच्यावतीने ६ ते ७ दिवसांचे निसर्ग भटकंती शिबिर मानपाडा येथील निसर्ग परिचय केंद्रात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ ते १३ वयोगटातील मुलांसाठी कागदी पिशव्या, कागदी फुले, वारली चित्रकला, दगडावर चित्रकला, वाइल्ड क्राफ्ट यांसह बागकाम कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. कोकेडामा, टेरॅरियम, मातीशिल्प यांसारख्या उपक्रमांमधून मुलांना सर्जनशीलतेची संधी मिळणार आहे.
एप्रिल महिना संपत आला तरी काही शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. यामुळे शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु अद्याप शिबिराच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत, असे वनशक्ती संस्थेच्या चित्रा म्हस्के यांनी सांगितले.
