Praveen Davane Swagat Adhyaksh Thane: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निघणाऱ्या ठाण्यातील मराठी नववर्ष स्वागत यात्रेच्या २०२७ मधील आयोजनाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी स्वागत यात्रेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच यात्रेच्या निमित्ताने पुढील पाच महिन्यांत विविध सांस्कृतिक, साहित्यिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ठाणे शहरात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेली स्वागत यात्रा ही केवळ नववर्ष स्वागतापुरती मर्यादित न राहता सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवरील जनजागृतीचे व्यासपीठ म्हणूनही ओळखली जाते. यात्रेत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर आधारित चित्ररथ सादर केले जातात. पारंपरिक वेशभूषेतील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शाळकरी मुलांचा मोठा सहभाग हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. विविध संस्था, मंडळे आणि नागरिकांच्या सहभागामुळे यात्रेला दरवर्षी उत्साहपूर्ण स्वरूप प्राप्त होते.
२०२७ च्या स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच महिन्यांत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता गडकरी रंगायतन येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील ‘सुरकल्प फाउंडेशन’च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात डॉ. आशीष रानडे यांचा ‘स्वर दीपावली’ हा सांगीतिक कार्यक्रम होणार असून, चारुदत्त आफळे बुवा यांचे निरूपण लाभणार आहे.
याशिवाय तरुणांसाठी व्याख्याने, विविध सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वाराणसी येथील पंडितांच्या माध्यमातून दोन ठिकाणी गंगा आरतीचे आयोजनही केले जाणार आहे. भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने ‘इंडियन नॉलेज सिस्टीम’ या विषयावर आधारित रील स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. भीष्म आणि अभिजित जोग यांच्या पुढाकाराने जानेवारी २०२७ मध्ये ही स्पर्धा होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचाही सहभाग असणार आहे. पुस्तकप्रेमींनी या महोत्सवाला भेट देऊन विविध उपक्रमांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.
