ठाणे : अनेक तडीपार लोक ठाण्यात मोकाट फिरत आहेत. हे गुंड शहरात धुमाकूळ घालणार आहेत का, असा थेट सवाल भाजप आमदार संजय केळकर यांनी पोलिस यंत्रणेला गुरूवारी केला.ठाण्यात राजकीय वैमनस्य, हेवेदावे वा राजकीय स्पर्धेतून हत्या होत असतील तर त्यांची कोणाचीही मुलाहिजा न ठेवता सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाणे शहरातील वाढत्या पुनर्विकास व क्लस्टर प्रकल्पांमध्ये अर्थकारण असल्याने भविष्यात संघर्ष वाढण्याची शक्यता असल्याचा दावा करत आतापासूनच कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे केळकर यांनी सांगितले.ठाणे शहराची सांस्कृतिक व ऐतिहासिक शहर अशी ओळख आहे. जागृत नागरिकांचे शहर म्हणून ठाण्याकडे पाहिले जाते. अशा शहरात हत्या होण्याच्या घटना घडणे ही गंभीर व दुर्दैवी बाब आहे. काल घडलेले प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचे प्रकरण क्लेशकारक, दुःखद व संतापजनक आहे.
भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कोणाचेही होणार नाही, यासाठी कारवाई आवश्यक आहे, असे केळकर म्हणाले. ठाणे शहर हे गुन्ह्यांचे शहर नाही. पोलिस दलाने अमली पदार्थांसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठ्या कारवाया केल्या आहेत. मात्र, शहरातील विविध भागांत हत्या वा गंभीर गुन्हे घडत असतील तर पोलिसांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. गल्लीबोळात वा शहरातील निरनिराळ्या भागांत हत्या झाल्या नाही पाहिजेत. पोलिसांनी पुढच्या काळात डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तडीपार व्यक्ती शहरात मोकाट
ठाणे शहरात तडीपार केलेल्या व्यक्ती फिरत असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असा दावा केळकर यांनी केला. अनेक तडीपार व्यक्ती ठाण्यातच फिरत आहेत. हे गुंड या शहरात धुमाकूळ घालणार आहेत का, असा थेट सवाल त्यांनी पोलिस यंत्रणेला केला. या विषयावर पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे केळकर म्हणाले. संशयित वा संबंधित व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावून माहिती घेणे आवश्यक आहे. एखादी बाब लपवली वा दाबली जात असल्याचे चित्र जनमानसात निर्माण होणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.चौकीदाराच्या भूमिकेतून आवाज उठवतो
ठाणे शहरावर माझे प्रेम आहे. माझ्या कुटुंबाच्या चार पिढ्या या शहरात राहिल्या आहेत. शहरात जे चांगले घडेल, त्यासाठी माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करतो. कुठे वाईट घडत असेल तर त्याविरोधातही आवाज उठवतो. हा विरोधला म्हणून विरोध नाही, तर शहराचा चौकीदार म्हणून माझी भूमिका आहे, असे केळकर म्हणाले.
पुनर्विकास, क्लस्टरमधून मोठे अर्थकारणठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. एसआरएचे प्रकल्प तसेच क्लस्टर पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकल्पांमध्ये मोठे अर्थकारण आहे. कोणाला काम मिळणार, कोणाचे वर्चस्व असेल, यावरून संघर्ष निर्माण होऊ शकतो. भविष्यात या आर्थिक हितसंबंधातून गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच पोलीस व प्रशासनाने काळजीपूर्वक नियोजन करून कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे केळकर यांनी स्पष्ट केले.
