ठाणे : ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (टीडीआरएफ) जवान विकास गोरे (३१) यांच्या मृत्यूला २४ तास उलटूनही या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांकडून ठेकेदाराविरोधात गुन्हा नोंदवून घेतला जात नसल्याचा आरोप विकास गोरे यांच्या नातेवाईकांनी माध्यमांसमोर केला. मात्र, हा आरोप पोलिसांनी फेटाळून लावत प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘टीडीआरएफ’चे जवान विकास गोरे यांचा सोमवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील कळंभे परिसरात खड्ड्यात दुचाकी आदळल्याने मृत्यू झाला होता. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अनेक आपत्तींच्या घटनांमध्ये विकास गोरे यांनी बचाव, शोधकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली आहे. मात्र, विकास गोरे यांचा मृत्यू रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाल्याचा दावा करत, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसेच, पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
कोट विकास गोरे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी ‘एडीआर’ची नोंद करण्यात आली आहे. या अपघातासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अहवाल तयार केला जात आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबाबदार व्यक्तींविरोधात नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.- डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण.
